मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

परमबीर सिंग 'फरार', जुहूतल्या फ्लॅटच्या दरवाज्यावर कोर्टाची ऑर्डर

परमबीर सिंग 'फरार', जुहूतल्या फ्लॅटच्या दरवाज्यावर कोर्टाची ऑर्डर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या घराबाहेर त्यांच्या फरार (absconding) असल्याची नोटीस (Notice) लावण्यात आली आहे.

  मुंबई, 23 नोव्हेंबर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या घराबाहेर त्यांच्या फरार (absconding)  असल्याची नोटीस (Notice) लावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या किला कोर्टात झालेल्या सुनावणीत गोरेगाव पोलीस ठाणे (Goregaon Police Station) येथे दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी प्रकरणी कोर्टाने सिंग यांना फरार घोषित केलं होतं. कोर्टाची हीच नोटीस आता त्यांच्या जुहू (Juhu) येथील फ्लॅटच्या दरवाज्यावर लावण्यात आली आहे. संबंधित कारवाई ही कोर्टाच्या आदेशान्वे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  परमबीर सिंग फरार नाहीत, वकिलांचा सुप्रीम कोर्टात दावा

  कोर्टाने एकीडे परमबीर सिंग यांना फरार घोषित केलंय. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या याचिकेत परमबीर यांच्या वकिलांनी ते फरार नसून देशातच असल्याचा दावा केला आहे. तसेच ते लवकरच मुंबईत परतणार असल्याची माहिती कोर्टाला दिली होती. पण त्यांनी मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नसल्याचं सांगत केंद्रीय यंत्रणांनी चौकशी करावी, अशी विनंती परमबीर यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी परमबीर सिंग यांना अटक न करण्याचे आदेश दिले होते. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 6 डिसेंबरला होणार आहे. हेही वाचा : परमबीर सिंग फरार नाहीत, देशातच आहेत; लवकरच मुंबईत दाखल होण्याची शक्यता

  नेमकं प्रकरण काय?

  परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसूलीचे गंभीर आरोप करत मोठी खळबळ उडवून दिली होती. परमबीर सिंग हे या प्रकरणातील फिर्यादी आहेत. तर दुसरीकडे श्यामसुंदर अग्रवाल यांनी सिंग यांच्यावर खंडणीचे गंभीर आरोप करत गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या आरोपांप्रकरणी आतापर्यंत 4 पोलीस अधिकाऱ्यांना अटकही करण्यात आली आहे. मुंबई पोलीस सिंग यांचा शोध घेत आहेत. ते चौकशीसाठी सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं. त्यामुळे सिंग यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण त्याआधीच कोर्टाने त्यांना फरार घोषित केलं. त्यांच्यासह रियाज भाटी आणि विनय सिंग यांना देखील फरार घोषित करण्यात आलं. तसेच या प्रकरणी पोलीस निरीक्षक आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळे यांना अटक करण्यात आली आहे. हेही वाचा : महाविकास आघाडीकडून भाजपला धोबीपछाड, सर्वाधिक जागा जिंकत बँकेवर वर्चस्व

  ...तर परमबीर सिंग यांची संपत्ती जप्त होईल

  किला कोर्टाने त्यांना फरार घोषित केल्यानंतर आपली संपत्ती जप्त होईल, अशी भीती परमबीर सिंग यांना वाटली. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात अटपूर्व जामीनासाठी धाव घेतली. त्यांच्या जामिनावर आता 6 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. एककीडे सुप्रीम कोर्टात या प्रकरणी खटला सुरु असताना दुसरीकडे मुंबई पोलिसांची कारवाई सुरु आहे. सिंग यांच्या घराबाहेर लावलेल्या नोटीसमध्ये 30 दिवसांत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण ते तरीही हजर राहिले नाहीत तर त्यांची संपत्ती जप्त होऊ शकते.
  Published by:Chetan Patil
  First published:

  पुढील बातम्या