मुंबई, 27 मे : हनिट्रॅपचा (Honeytrap) वापर हा हेरांकडून माहिती काढणे, व्यापाऱ्यांना अडकवणे अशा प्रामुख्याने मोठ्या गुन्ह्यांसाठी झालेला आपण पाहिला आहे. पण आता हनिट्रॅपचा वापर करून अगदी आपल्या आजुबाजुच्यांनाही फसवलं जात आहे. ब्लॅकमेलिंगद्वारे (Blackmailing) त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. मुंबईच्या घाटकोपरमध्ये (Ghatkopar) असाच एक प्रकार समोर आला. एका तरुणाला अडकवून धमक्या देऊन त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाला. पण त्याच्या एका मित्राने वकिलाच्या मदतीने त्याला वाचवले.
(वाचा-Pune : खेड पंचायत समिती सभापती पदाचा वाद, हॉटेलात झालेल्या हल्लात दोन सदस्य जखमी)
घाटकोपरच्या या तरुणाच्या मोबाईलवर काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा फोन आला. विजयशी बोलायचं असं तिनं सांगितलं. तरुणाने राँग नंबर म्हटले. पण तरी तरुणी ऐकेना शेवटी त्यानं व्हिडिओ कॉल करून खात्री पटवून दिली. शबनम नावाच्या या तरुणीनं नंतर त्याच्याशी ओळख वाढवली. त्याला कल्याणला भेटायलाही बोलावलं. पण लॉकडाऊनमुळं ते टळलं. पण नंतर शबनमच त्याला भेटण्यासाठी 20 मे रोजी घाटकोपरच्या असल्फामध्ये आली. ते लॉजमध्ये भेटले. पण बाहेर येताच तरुणीच्या पाच-सहा साथीदारांनी तरुणाचं अपहरण केलं.
(वाचा-Sagar Dhankhar Murder: सुशील कुमारने फेटाळले सर्व आरोप, हत्या प्रकरणाला नवं वळण)
अपहरणानंतर अचानक तरुणाचा मित्र साहील नाडर तिथं आला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं तो भासवू लागला. पण प्रत्यक्षात तोच मास्टर माईंड होता. तरुणाला मात्र याची माहिती नव्हती. तो तरुण अपहरणकर्त्यांशी मध्यस्थांसारखं बोलू लागला. त्यावेळी कारमध्येच बोलणी सुरू असताना अपहरणकर्त्यांनी 20 लाखांची खंडणी मागितली. त्यात नाडर मध्यस्थीचं नाटक करू लागला. या दरम्यान मारहाणीचा प्रकारही झाला. अखेर 1 लाख रुपये देण्याचं ठरलं. त्यापैकी 10 हजार लगेचच नाडरच्या खात्यावर टाकून तरुणानं स्वतःची सुटका करून घेतली.
या नंतर या आरोपींनी तरुणाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. कुटुंबाला यात अडकवणार अशाही धमक्या दिल्या. यामुळं तरुण प्रचंड तणावात होता. आत्महत्येपर्यंत त्याचा विचार गेला. पण त्यानं एका जवळच्या मित्राला हे सर्व सांगितलं. त्यानंतर त्याने तरुणाला वकील नितू सिंग यांच्याकडं नेल. त्यांनी तरुणाला धीर देत, पोलिसांत तक्रार करण्यास सांगितलं. तरुणाने लगेचच घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाचा मित्र आणि मुख्य आरोपी साहिल नाडरसह आरोपींना बेड्या ठोकल्या.
साहिल नाडर हा पीडित तरुणाचा मित्र आहे. त्यानेच संपूर्ण ट्रॅप रचला होता. यापैकी तिघांना अटक असून तरुणी शबनमसह आणखी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळं अशाप्रकारे विविध प्रकारे लुटण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. त्यामुळं आपल्याला, कुटुंबातील कुणाला किंवा मित्रांना असे कॉल आल्यास सावध राहा. नसता तुम्हीही या 'हनीट्रॅप' चे शिकार होऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai