मुंबई, 9 मार्च: मुंबईत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईत दररोज तब्बल 22 ते 23 हजार चाचण्या कराव्या लागत आहेत. यामध्ये 98 टक्के रुग्ण हे पक्या इमारतीत राहणारे आहेत. तर केवळ 2 ते 3 टक्के रुग्ण हे झोपडपट्टी परिसरातील आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढीतील दरी स्पष्ट होतं आहे. तसेच येणाऱ्या काळात मुंबईत रुग्णसंख्या वाढली, तर मुंबईत पुन्हा लॉकडाऊन करण्याची सर्व तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर लॉकडाऊनचं सावट घोंघावत आहे. मुंबईतील कोरोना प्रादुर्भावाबाबत माहिती देताना काकाणी म्हणाले की, आम्ही सध्या नियमाचं पालन करण्यावर भर देत आहोत. नागरिकांनी योग्य सहकार्य केलं, तर मुंबईत पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याची वेळ येणार नाही. मुंबईतील विविध ठिकाणी आमची भरारी पथकं अचानक पाहणी करत आहेत. तसेच ज्या लोकांना विलगिकरणात ठेवलं आहे, त्यांची तपासणीही केली जात आहे. आपल्याकडे कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण टक्केवारीमध्ये कमी झाले आहे. ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे. 60 टक्के बेड रिकामे मुंबईत कोरोनाशी दोन हात करण्याची सर्व तयारी झाली असल्याचं सांगताना काकाणी म्हणाले की, मुंबईत सध्या 60 टक्के बेड रिकामे आहेत. तर मुंबईत अनेक छोट्या छोट्या ठिकाणी लॉकडाऊन करण्याची तयारी पूर्ण केली आहे. शिवाय दर आठ दिवसात कोरोनाच्या परिस्थितीची सर्व माहिती घेतली जात आहे. तसेच मुंबई प्रशासनाकडून दररोज 40 हजार लोकांचं लसीकरण केलं जात आहे. येणाऱ्या काळात काही खाजगी रुग्णालयेही लसीकरण मोहिमेत सामावून घेतली जाणार आहेत. हे ही वाचा- गेल्यावर्षी या आठवड्यापर्यंत सर्वकाही होतं आलबेल, पण 9 मार्च 2020 रोजी बदललं पुणेकरांसह राज्याचं जीवन मुंबईत कोरोनाचा नवा स्ट्रेन नाही तिसऱ्या टप्प्यात 30 लाख लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यातील 10 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. त्यासाठी मुंबईत एकूण 67 लसीकरण केंद्रे उभारली आहेत. 90 जणांचे कोरोना नमुने आम्ही पुण्याला पाठवले होते. त्यापैकी एका रुग्णाला ब्रिटनच्या विषाणूची लागण झाल्याचं दिसून आलं. पण तो रुग्ण आता बरा झाला आहे आणि त्याचे सर्व संपर्कही आम्ही तपासले आहेत. त्यामुळे या नवीन स्ट्रेनच्या विषाणूचा मुंबईत शिरकाव झाला असं थेट म्हणता येणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.