मुंबई 20 मार्च : राज्याची राजधानी मुंबईमध्ये सध्या अनेक ठिकाणी रस्ते निर्मितीची कामं सुरू आहेत. त्यापैकी कोस्टल रोड हा सर्वांत महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. ठिकठिकाणी त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे वेळोवेळी वाहतुकीमध्ये काही आवश्यक बदल करावे लागतात. आताही मुंबई वाहतूक पोलिसांनी याबाबत एक सूचना जारी केली आहे. कोस्टल रोड प्रकल्पाच्या सुरू असलेल्या बांधकामामुळे, मुंबई वाहतूक विभागचे डीसीपी गौरवसिंग यांनी रविवारी वाहनचालकांसाठी ही सूचना जारी केली आहे. वाहनचालकांना गर्दी टाळण्यासाठी पर्यायी मार्गानं जाण्याची विनंती करण्यात आली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोखंडी डिव्हायडर कारच्या थेट आरपार; काळजाचा थरकाप उडवणारे फोटो
'मिड डे'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या सूचनेमध्ये मुंबई वाहतूक पोलिसांनी म्हटलं आहे की, एन. एस. रोडच्या (मरिन ड्राइव्ह) बाजूने मुंबई कोस्टल रोडचं बांधकाम सुरू आहे. मरिन ड्राईव्हवरील काम शेवटच्या टप्प्यात आहे. कोस्टल रोड कन्स्ट्रक्शन एजन्सीच्या नियोजनानुसार, एन. एस. रोडच्या दक्षिणेकडील तारापोरवाला मत्स्यालयापासून ते दक्षिण मुंबईतील इस्लाम जिमखान्यापर्यंतच्या कॅरेजवेवर ड्रेनेज आउटफॉलचं काम करणं आवश्यक आहे. हे बांधकाम व्यवस्थित पार पाडण्यासाठी एन. एस. रोडवरील सध्याची दक्षिणेकडे जाणारी वाहतूक जिमखान्याला समांतर चालणाऱ्या सर्व्हिस रोडवरून वळवली जाईल. त्यामुळे वाहनांची गती संथ होण्याची आणि काही ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सूचनेत पुढे म्हटलं आहे की, हे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे पाच महिन्यांचा कालावधी लागेल. मुंबई वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांची यादीही शेअर केली आहे. या यादीनुसार, दक्षिण मुंबईकडे (कुलाबा, कफ परेड, चर्चगेट, नरिमन पॉइंट) प्रवास करू इच्छिणाऱ्या वाहनचालकांना त्यांच्या प्रवासासाठी महर्षि कर्वे रोड वापरण्याचा आणि खालील इतर मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे-
- केम्प्स कॉर्नर, नाना चौक, ऑपेरा हाऊस, सैफी हॉस्पिटल, गोधा गाडी जंक्शन, मरिन लाइन्स स्टेशन, इन्कम टॅक्स ऑफिस, चर्चगेट जंक्शन, गोदरेज जंक्शन मार्गे इच्छित स्थळी जावं.
- पेडर रोड, आरटीआय जंक्शन, सेसिल जंक्शन, सुख सागर जंक्शनजवळून डावीकडे वळून ऑपेरा हाऊस, सैफी हॉस्पिटल, गोधा गाडी जंक्शन, मरिन लाइन्स स्टेशन, इन्कम टॅक्स ऑफिस, चर्चगेट जंक्शन मार्गे इच्छित स्थळी जावं.
- वाळकेश्वर, बँडस्टँड, विल्सन कॉलेज, चौपाटी, ऑपेरा हाऊस, सैफी हॉस्पिटल, गोधा गाडी जंक्शन, मरिन लाइन्स स्टेशन, इन्कम टॅक्स ऑफिस, चर्चगेट जंक्शन मार्गे इच्छित स्थळी जावं.
"भविष्यातील चांगल्या सोयीसाठी सध्या होणारी गैरसोय सहन करावी," अशी विनंतीही मुंबई वाहतूक पोलिसांनी आपल्या सूचनेत केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai News, Traffic department