मुंबई, 20 जानेवारी : मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला आता बोरिवलीतही स्टॉप असणार आहे. ही रेल्वे येत्या 23 जानेवारीपासून बोरिवलीतही थांबणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. त्याचबरोबर 30 मे 2023 पासून ही रेल्वे 'रविवार सोडून अन्य दिवस' ऐवजी बुधवार सोडून अन्य दिवशी चालविण्यात येणार असल्याचं पश्चिम रेल्वेनं स्पष्ट केलंय.
कसं असेल वेळापत्रक?
पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार 23 जानेवारीपासून 20901 ही मुंबई सेंट्रल-गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलवरून 6 वाजून 10 मिनिटांच्या ऐवजी 6 वाजता प्रस्थान करेल. ही रेल्वे बोरिवली स्टेशनवर 6.23 वाजता दाखल होईल आणि 6.25 ला सुटेल. त्यानंतर वापी स्टेशनवर 7.56 ला दाखल होईल आणि 7.58 मिनिटांनी सुटेल. अन्य स्टेशनवरील या रेल्वेचे आगमन आणि प्रस्थानाच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Mumbai : रेल्वेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानं पाहायलाच पाहिजे असं ठिकाण, Video
त्याचबरोबर परतीच्या प्रवासात 23 जानेवारीपासून 20902 ही गांधीनगर - मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन ही वंदे भारत एक्स्प्रेस बोरिवली स्टेशनवर संध्याकाळी 7.32 वाजता पोहचेल आणि 7.34 वाजता सुटेल. मुंबई स्टेशनवर या रेल्वेचं आगमन रात्री 8 वाजून 15 मिनिटांच्या ऐवजी 8.25 मिनिटांनी होईल.
30 मे 2023 पासून ही रेल्वे रविवार सोडून अन्य दिवसांच्या ऐवजी बुधवार सोडून अन्य दिवस धावेल. त्यासाठीचे आरक्षण नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होईल. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in. ही वेबसाईट पाहावी, असं आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
'वंदे भारत' मध्ये कवच' तंत्रज्ञान (ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम) आहे. ही एक स्वयंचलित सुरक्षा प्रणाली असून ही प्रणाली दोन गाड्यांची टक्कर होण्यापासून रोखते. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान भारतातच विकसित करण्यात आलं असून परदेशातून आयात होणाऱ्या ट्रेनच्या तुलनेत कमी खर्चात बनवलं जातं. आठवड्यातून सहा तास धावणाऱ्या या रेल्वेमुळे अवघ्या सहा तासांमध्ये मुंबईतून गांधीनगरमध्ये पोहचता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Local18, Mumbai, Train