मुंबई, 10 जानेवारी : मध्य रेल्वेचं मुख्यालय असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशनवर रोज हजारो प्रवाशी ये-जा करत असतात. या सर्व प्रवाशांचं लक्ष हे प्लॅटफॉर्मवर लागलेली ट्रेन आणि इंडिकेटरकडं असतं. ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या या देखण्या वास्तूच्या एका कोपऱ्याकडं सहसा कुणाचं लक्ष जात नाही. हा कोपरा रेल्वेचा इतिहास सांगतो. मुंबईच्याच नाही तर देशाच्या लाईफलाईनची ओळख करुन देतो. भारतीय रेल्वेवर प्रेम करणाऱ्या, देश समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकानं हा इतिहास माहिती करुन घ्यायला हवा.
रेल्वेचा इतिहास सांगणारी जागा
रोज लाखो प्रवाशांचा भार वाहणाऱ्या ‘भारतीय रेल्वे’ नामक प्रचंड आणि अजब यंत्रणेच्या इतिहासात डोकावलं, तर अनेक रंजक, माहितीपूर्ण गोष्टी समोर येतात. रेल्वेच्या आणि पर्यायानं भारताच्या इतिहासात डोकावण्याची नेमकी हीच संधी सीएसएमटीच्या वारसा इमारतीतील छोटेखानी ‘हेरिटेज म्युझियम’ देते.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील मुख्यालयातील तळमजल्यावर एक छोटेसे हेरिटेज म्युझियम आहे. यामध्ये रेल्वेचा इतिहास सांगणारे जुने फोटो इमारतीचा आराखडा रेल्वे छोटे इंजिनासह अन्य वस्तू आहे. 1853 साली मुंबई ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली. तेंव्हापासून आजवर रेल्वेमध्ये अनेक बदल झाले. रेल्वे सुरू झाल्यावर कालांतराने रेल्वे गाड्या, इंजिन यात बदल झाले. 1925 साली हिली विजेवर धावणारी रेल्वे सुरू झाली. ही सर्व ऐतिहासिक चित्रे या हेरिटेज म्युझियममध्ये आहेत.
3 महिने कोमात, 72 टक्के अपंगत्व...तरी पुणेकरानं जिद्दीनं सुरू केलं ड्रायव्हिंग स्कुल, पाहा Video
काय पाहाल?
ब्रिटिश काळापासून असलेली कागदपत्रे रेल्वे गाड्याचे मॉडेल, जुनी छायाचित्रे येथे पाहायला मिळतात. जुन्या छायाचित्रांमध्ये पूर्वीच्याकाळी वापरण्यात आलेले टेलिफोन, संदेश वाहनाचे मोर्स यंत्र, भांडी, कंदील, अधिकाऱ्यांचे बॅच, इंजिन आणि डब्यांवरील लोगो, जुनं तिकीट हा सर्व ऐतिहासिक खजिना इथं जतन करून ठेवण्यात आला आहे.
कोव्हिड काळात हे संग्रहालय पर्यटकांसाठी बंद होत. मात्र आता ते पुन्हा पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. या म्युझियमध्ये रेल्वे डब्यांची निर्मिती, जुन्या काळातील डबे, आत्ताचे डबे कसे आहेत. येणारी बुलेट ट्रेन किंवा वंदे भारत ट्रेन, याशिवाय जुन्या काळातील रेल्वे स्टेशन, जुन्या काळातील तिकीट सिस्टम हा संपूर्ण इतिहास नाममात्र शुल्कामध्ये पाहता येतो अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून कामानिमित्त मुंबईतच राहत असल्याने पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे असलेल्या रेल्वेचे संग्रहालय पाहण्यासाठी आलो. या ठिकाणी रेल्वेचा संपूर्ण इतिहास बघायला मिळतो. तुम्ही मुंबईला आल्यावर या ठिकाणाला नक्की भेट द्या अशी भावना मध्य प्रदेशातील पर्यटक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी व्यक्त केली.
गुगल मॅपवरून साभार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Local18, Mumbai