मुंबई, 3 मार्च : ‘कोस्टल रोड’ बोगद्याचे 100 मीटरचे खोदकाम पूर्ण झाले आहे. मावळा या यंत्राद्वारे हे काम सतत करण्यात येत होते. या बोगद्याचे खोदकाम जमिनीखाली 10 मीटर ते 70 मीटर पर्यंत केले जात आहे. सागरी किनारा मार्ग हा मुंबई महानगरपालिकेचा (BMC) महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याचा एक महत्त्वाचा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या महाबोगद्याचे खोदकाम ‘मावळा’ या आतापर्यंत भारतात वापरण्यात आलेल्या यंत्रापैकी सर्वात मोठ्या यंत्राने पूर्ण केले आहे. सागरी किनारा मार्गाचा महत्त्वाचा भाग असणारे महाबोगदे खोदण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘मावळा’ या यंत्राद्वारे 11 जानेवारील सुरुवात झाली होती. तेव्हापासून हे बोगदे खणण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. सागरी किनारा मार्गासाठी दोन बोगदे खोदावे लागणार आहेत. त्याच्या कामाची सुरुवात प्रियदर्शनी पार्क येथे करण्यात आली होती. हे बोगदे प्रियदर्शनी पार्क , मरिन ड्राईव्ह , ‘मलबार हिल’ च्या खालून जाणार आहेत. हे बोगदे खणण्यासाठी 12.19 मीटर व्यासचे ‘टनेल बोरिंग मशीन’ वापरण्यात येत आहे. या संयंत्राचे ‘मावळा’ असे नामकरण करण्यात आले आहे. दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी 2.07 किलोमीटर एवढी असणार आहे. तसंच खणण्यात येत असलेल्या दोन्ही बोगद्यांचा व्यास हा प्रत्येकी 12.19 मीटर असणार आहे. हेही वाचा - सं गणक परिचालक थेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यात घुसले, मात्र मूळ समस्या नेमकी आहे तरी काय? दोन्ही बोगदे हे दोन बाजूंच्या वाहतुकीसाठी अर्थात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्रपणे उपयोगात येतील. याच वेगाने हे काम करण्यासाठी प्रत्येकी साधारणपणे 9 महिने लागणार आहेत. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार हे काम व्यवस्थितपणे सुरू असून वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मुंबई महापालिकेचा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळेच अश्विनी भिडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांच्या येण्याने या प्रकल्पाला वेग आला असून हे काम वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.