Home /News /mumbai /

घटस्थापनेपासून धार्मिक स्थळं उघडणार, सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईतल्या मशिदीमध्ये होणार 'हलाल सॅनिटायझर'चा वापर

घटस्थापनेपासून धार्मिक स्थळं उघडणार, सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईतल्या मशिदीमध्ये होणार 'हलाल सॅनिटायझर'चा वापर

इस्लाम धर्मात (Islam) अल्कोहोलच्या वापराला परवानगी नसल्याने, हाजी अली आणि माहीम दर्ग्यामध्ये येणाऱ्यांसाठी हलाल सॅनिटायझरचा (Halal Sanitizer) म्हणजेच अल्कोहोल नसलेल्या सॅनिटायझरचा वापर केला जाणार आहे.

  मुंबई, 6 ऑक्टोबर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात दीर्घ काळ बंद असलेली सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळं गुरुवार 7 ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याकरता घालून दिलेल्या नियमांच्या पूर्ततेसाठी सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांमध्ये पूर्वतयारी सुरू आहे. मुंबईतल्या मशिदीही (Mosques in Mumbai) उद्यापासून उघडणार असून, हाजी अली आणि माहीम दर्गा यांसारखी सूफी प्रार्थनास्थळंही उघडणार आहेत. सॅनिटायझरचा (Use of Sanitizer) वापर करणं बंधनकारक करण्यात आलं असून, सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल (Alcohol) हा प्रमुख घटक असतो. इस्लाम धर्मात (Islam) अल्कोहोलच्या वापराला परवानगी नसल्याने, हाजी अली आणि माहीम दर्ग्यामध्ये येणाऱ्यांसाठी हलाल सॅनिटायझरचा (Halal Sanitizer) म्हणजेच अल्कोहोल नसलेल्या सॅनिटायझरचा वापर केला जाणार आहे. संबंधित प्रार्थनास्थळांच्या ट्रस्टींकडून ही माहिती देण्यात आली आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता बऱ्यापैकी कमी झाला असून, लसीकरणाचा टक्काही वाढला आहे. त्यामुळे प्रार्थनास्थळं उघडण्याची बऱ्याच काळापासून होत असलेली मागणी अखेर राज्य सरकारने मान्य केली आणि त्यासाठी घटस्थापनेचा मुहूर्त शोधला. प्रार्थनास्थळं उघडण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी त्यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यात स्वच्छता राखण्यासह सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, मास्कचा वापर यांसह अनेक गोष्टींचा समावेश आहे. हे नियम पाळले जाण्याच्या अनुषंगाने सर्व प्रार्थनास्थळांमध्ये लगबग सुरू झाली आहे. सॅनिटायझरमध्ये प्रामुख्याने अल्कोहोल हा घटक असतो. इस्लाम धर्मात अल्कोहोलच्या वापराला परवानगी नाही. त्यामुळे हाजी अली, माहीम दर्ग्यासारख्या काही प्रमुख सूफी प्रार्थनास्थळांनी (Sufi Shrines) हलाल अर्थात अल्कोहोलचा वापर नसलेल्या (Non Alchoholic Sanitizer) सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. या हलाल सॅनिटायझर्समध्ये अल्कोहोलऐवजी हायड्रोजन पेरॉक्साइड (Hydrogen Peroxide) आणि कोलॉयडजल सिल्व्हरचा (Colloidal Silver) वापर केलेला असेल.

  BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'या' पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

  माहीम दर्ग्याचे व्यवस्थापकीय ट्रस्टी आणि हाजी अली दर्ग्याचे ट्रस्टी सोहेल खांडवानी यांनी सांगितलं, 'सरकारने घालून दिलेले नियम पाळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही हलाल सॅनिटायझर्स ठेवणार आहोत. कोणालाही मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचं पालनही काटेकोरपणे केलं जाईल. गर्दीचं योग्य तऱ्हेने व्यवस्थापन करण्यासाठी हाजी अली आणि माहीम दर्ग्यात पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळ्या रांगा केल्या जाणार आहेत.' माहीम दर्ग्यामध्ये एका वेळी जास्तीत जास्त 30 ते 35 जणांना प्रवेश दिला जाणार असून, नमाजाच्या वेळी मॅटवर सोशल डिस्टन्सिंगचं योग्य तऱ्हेने पालन केलं जाणार आहे.

  'राज्यात गरबा-दांडिया नाहीच, रावण दहन करा पण प्रेक्षक नाही' पहा मार्गदर्शक सूचना

  क्रॉफर्ड मार्केट आणि मरीन लाइन्सचं बडा कब्रस्थान या दोन्ही ठिकाणी असलेल्या जुम्मा मशिदींचं व्यवस्थापन जुम्मा मस्जिद ऑफ बॉम्बे ट्रस्टतर्फे (Jumma Masjid of Bombay Trust) केलं जातं. या ट्रस्टचे अध्यक्ष शोएब खातिब यांनी सांगितलं, 'मशिदीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचं पूर्ण शरीर निर्जंतुक करणारं मशीन मशिदीच्या प्रवेशद्वारावर (Whole body Disinfection) बसवण्यात आलं आहे. संपूर्ण सॅनिटायझेशन झाल्याशिवाय कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही. सरकारने जारी केलेले सर्व नियम आणि अटी यांचं पालन आम्ही पूर्णतः करणार आहोत. नमाज पढताना दोघांमधली जागा रिकामी ठेवली जाणार आहे.' मशिदी आणि दर्गे यांचं व्यवस्थापन प्रामुख्याने दान आणि देणग्यांवर चालतं. लॉकडाउनमध्ये व्यवसायांवर खूप विपरीत परिणाम झाल्यामुळे आपल्या नियमित देणगीदारांनीही देणग्यांबाबत हात आखडता घेतल्याचं खांडवानी यांनी सांगितलं. आता प्रार्थनास्थळं पुन्हा उघडणार असल्यामुळे सर्व व्यवहार हळूहळू पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.
  First published:

  Tags: Mumbai, Sanitizer, Sanitizer and mask

  पुढील बातम्या