मुंबई, 11 जून : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या पराभवानंतर वेगवेगळे दावे केले जात आहे. शिवेसेनेकडून राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार झाला, असा दावा करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या दाव्यावर मनसेचे (MNS) नेते यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांनी टीका केली आहे. दुसऱ्याने केला तो घोडेबाजार आणि तुम्ही केलात तो काय भेंडीबाजार? असा सवाल यशवंत किल्लेदार यांनी उपस्थित केला. “घोडेबाजार झाला…घोडेबाजार झाला… बांग मारणारे संजय राऊतजी, मनसेचे नगरसेवक पळवताना करोडोचा घोडेबाजार केलात हे अवघा महाराष्ट्र जाणतो. दुसऱ्याने केला तो घोडेबाजार आणि तुम्ही केलात तो काय भेंडीबाजार”, असा घणाघात यशवंत किल्लेदार यांनी केला.
घोडेबाजार झाला..घोडेबाजार झाला...
— Yashwant Killedar (@YKilledar) June 11, 2022
बांग मारणारे संजय राऊतजी,
मनसेचे नगरसेवक पळवताना करोडोचा घोडेबाजार केलात हेअवघा महाराष्ट्र जाणतो.
दुसऱ्याने केला तो घोडेबाजार आणि तुम्ही केलात तो काय भेंडीबाजार #राज्यसभानिडणुक
( राज्यसभेत एका उमेदवाराच्या पराभवानंतर शिवसेनेच्या गोटात घडामोडींना वेग ) मुंबईत 2017 मध्ये राजकीय भूकंप घडला होता. शिवसेनेने मनसेच्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक फोडले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी माटेकर, दिलीप लांडे, हर्षला मोरे आणि दत्तात्रय नरवणकर या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर संजय तुरडे हे एकमेव मनसेचे नगरसेवक राहिले होते. याच घटनेचा दाखल देत यशवंत किल्लेदार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत एका उमेदवाराच्या पराभवानंतर संजय राऊत यांनी भूमिका मांडली. “छोटे पक्ष आहेत जे महाविकास आघाडीसोबत आहेत त्यांचे एकही मत फुटलं नाही. जे आघाडीसोबत आहेत ती सर्व मते आम्हाला मिळाली. फक्त घोडेबाजारात जे काही उभे होते लोकं.. त्यांची सहा-सात मते आम्हाला मिळू शकले नाहीत. आम्ही कुठलाही व्यवहारात पडलो नाही. आम्ही व्यापारही केला नाही. तरीही आमच्या संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मते मिळाली हा सुद्धा आमच्यासाठी एक विजय आहे. अर्थात ज्या कुणीही शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची नावे आमच्याकडे आहेत. आम्हााल माहिती आहे कुणी मतदान केलं नाही. ठिक आहे पाहून घेऊ”, असं संजय राऊत म्हणाले.