Home /News /mumbai /

सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे शिवसेनेत परतण्यास इच्छुक नाहीत, मिलिंद नार्वेकरांच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर

सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे शिवसेनेत परतण्यास इच्छुक नाहीत, मिलिंद नार्वेकरांच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर

शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी मिलिंद नार्वेकर हे स्वत: एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी गुजरातला गेले. पण नार्वेकर यांना शिंदेंची समजूत काढण्यास यश आलं नाही.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 जून : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) आज खूप मोठा भूकंप घडू शकतो. कारण महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) संकटात सापडलं आहे. शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 35 आमदारांसह पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे जवळचे सहकारी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे स्वत: एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी गुजरातला (Gujrat) गेले आहेत. गुजरातच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह थांबले आहेत. तिथे मिलिंद नार्वेकर त्यांची भेट घेण्यासाठी गेले. विशेष म्हणजे नार्वेकर गेले तेव्हा त्यांना हॉटेलमध्ये आत प्रवेश दिला गेला नाही. हॉटेल प्रशासनासोबत बराच वेळ चर्चा केल्यानंतर अखेर एकनाथ शिंदे हे मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार झाले. दोन्ही नेत्यांमध्ये सलग अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत परतण्याची इच्छाच नसल्याचं मत व्यक्त केलं. त्यामुळे शिवसेनेसाठी पुढची वाट ही प्रचंड खडतर असल्याचं मानलं जात आहे. शिंदे 35 आमदारांसह सत्तेतून बाहेर पडले तर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरतच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंच्यासह तब्बल 17 आमदार आहेत. तर आणखी काही आमदार हे मुंबईहून चार्टड विमानाने गुजरातच्या दिशेला निघाले आहेत. शिंदे यांच्यासोबत पक्षातील तब्बल 35 आमदार आहेत. हे सर्वजण भाजपसोबत गेले तर भाजपला खूप मोठा फायदा होणार आहे. भाजप राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा देखील करु शकतं. त्याच पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडी घडवल्या जात असल्याचा कयास बांधला जात आहे. पण या घडामोडींमुळे शिवसेनेला खूप मोठा झटका बसला आहे. गुजरातमध्ये घडामोडींना प्रचंड वेग महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत देखील प्रचंड घडामोडी घडत आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अहमदाबाद येथील घरी गेल्याची चर्चा आहे. तर एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुजरातच्या सूरत शहरमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत अमित शहा यांची समोरासमोर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व बंदोबस्त केला जातोय. विशेष म्हणजे शिंदेंच्या समर्थक आमदारांना गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगर येथील फार्म हाऊसवर नेलं जाणार आहे. त्यासाठी सूरतच्या हॉटेलमधून या सर्व आमदारांचं एअर लिफ्टिंग केलं जाणार आहे. त्यामुळे शिंदे सत्तेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना जोर वाढू लागला आहे. (सुरतेतील खलबतं अयशस्वी झाली तर महाराष्ट्राचं तख्त बदलणार? पुढील 2 तासात काय घडू शकेल) दरम्यान, गुजरातमध्ये प्रचंड घडामोडी घडत आहेत. कारण गुजरातचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील हे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या भेटीला गेले आहेत. तिथे दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये पुढील रणनीतीबाबत चर्चा होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कोल्हापूरचे पाच माजी आमदार गोव्यात दाखल दुसरीकडे कोल्हापुरातील शिवसेनेचे सर्व माजी आमदार गोव्यात दाखल झाले आहेत. हे सर्व माजी आमदार एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत, अशी देखील माहिती समोर येत आहे. या माजी आमदारांमध्ये उल्हास पाटील, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर या सर्वांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजीत पाटील हे सर्वजण गोव्यात एकाचठिकाणी आहेत. तर सूरतला गेलेल्या आमदारांमध्ये कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर, सांगलीचे अनिल बाबर, सातारा जिल्ह्यातील शंभूराजे देसाई, महेश शिंदे यांचा समावेश आहे. या सर्व घडामोडींमुळे पश्चिम महाराष्ट्रातील पाच आमदारांनी थेट शिवसेनेलाच आव्हान दिलं आहे. कोल्हापूरच्या शिवसेनेच्या ज्या माजी आमदारांनी गोवा गाठलं आहे ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. या माजी आमदारांमधील बरेच जण पक्षावर नाराज होते. दरम्यान, राजेश क्षीरसागर यांचं राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्षपद कायम राहिलं होतं. पण इतर माजी आमदारांच्या हाती राज्यात शिवसेनेची सत्ता असूनही काहीच नव्हतं. त्यामुळे त्यांच्या मनात नाराजी होती. विशेष म्हणजे गोव्यात गेलेले शिवसेनेचे पाचही माजी आमदार यांचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. ते शिंदे यांचे समर्थक आहेत. राज्यात एवढ्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना शिवसेनेच्या पाच माजी आमदारांनी देखील गोवा गाठणं हे संकेत देखील महाविकास आघाडी सरकारसाठी धोक्याचे ठरु शकतात. आता या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि गोव्याकडील घडामोडींवर महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सरकार खरंच कोसळतं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डॅमेज कंट्रोल करण्यात यश येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या