मुंबई, 13 जुलै : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना अनेकदा तत्कालीन सत्ताधारी पक्षांमध्ये संघर्ष सुरु असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांसह बंड पुकारल्याने शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. तरीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही महाविकास आघाडीत असल्याचा दावा केला जातोय. तसं असलं तरी आता खरोखरच महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. कारण काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा हे मुंबई महापालिकेच्या प्रभागरचनेच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर उघडणे टीका करत असल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप मिलिंद देवरा यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. देवरा यांच्या या विधानामुळे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात दुरावा येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिकेत ज्याप्रमाणे वॉर्डरचना करण्यात आलीय ती पाहता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केला आहे. ही वॉर्ड रचना रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत असूनही राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना का पाठिंबा दिला? याबाबत काँग्रेस पक्ष त्यांना विचारणा करणार असल्याचं देवरा यांनी सांगितलं. ( पावसाळ्यात मुबंईकरांची पाण्यासाठी वणवण; घराबाहेर मुसळधार पण घरामध्ये …पाहा VIDEO ) मिलिंद देवरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. त्यापत्रात त्यांनी शिवसेनेकडून करण्यात आलेली वॉर्डरचना ही अनधिकृत किंवा अवैध आहे, असं म्हटलं आहे. दरम्यान, देवरा यांनी ‘News18 लोकमत’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. “मुंबई महापालिका भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. या मुंबई महापालिकेच्या निवडणुका मुक्तपणे आणि निष्पक्षपणे पार पडायला हव्यात. केवळ एका पक्षाच्या फायद्यासाठी मुंबईच्या वॉर्डरचनांमध्ये फेरबदल करणे हे अनैतिक आणि राजघटनेच्या विरोधात आहे. म्हणून मी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. सर्व पक्षांनी एकत्र यावं आणि नव्याने वॉर्डरचना व्हावी, असं आवाहन मिलिंद देवरा यांनी केलं. “महाविकास आघाडी सरकार असताना मुंबईच्या प्रभागरचेनेबाबत निर्णय झाला. या प्रभागरचनेवरुन काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला होता. तरीही शिवसेना एकतर्फी पुढे गेली. त्यामुळेच मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं”, असं मलिंद देवरा यांनी सांगितलं. दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवार द्रोपर्दी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न त्यांना विचारला असता उद्धव ठाकरेंनी अचनाक युटर्न का घेतला ते मला कळत नाहीय. याचं उत्तर कदाचित संजय राऊत यांच्याकडे असेल, असं उत्तर त्यांनी दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.