मुंबई, 16 जुलै : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोसळणारा पाऊस हा दोन दिवसांत उसंत घेईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली होती. विशेष म्हणजे पावसाचा दोन दिवसात वेग खरंच थोडासा मंदावल्याचं चित्र आहे. या दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी हवामान बदलाबद्दल एक महत्त्वाची माहिती दिली आहे. अरबी समुद्रात प्रचंड वेगाने वारे वाहणार आहेत. यांचा वेग तब्बल ताशी 45 ते 55 किमी असा असणार आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना होसाळीकर यांनी मासेमारीसाठी संबंधित कालावधीत जावू नये, असं आवाहन केलं आहे. के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जुलैला ईशान्य अरबी समुद्रावर, महाराष्ट्र आणि कर्नाटक किनाऱ्यावर तसचे पूर्व अरबी समुद्रावर ताशी 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. विशेष म्हणजे 65 किमी Gusting असण्याची शक्यता आहे.
मच्छिमार चेतावणी
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 16, 2022
16 ला ईशान्य अरबी समुद्रावर,महाराष्ट्र व कर्नाटक किनार्यावर व पूर्वमध्य अरबी समुद्रावर ताशी 45-55kmवाऱ्यासह ताशी 65km Gusting;
16,17 ला उत्तर अरबी समुद्र 16-20 जुलै दरम्यान गुजरातच्या किनार्यावर व पश्चिम मध्य नैऋत्य अरबी समुद्रावर;
मच्छिमारांना या भागात जाऊ नये
16 आणि 17 जुलैला उत्तर अरबी समुद्रावर जलद गतीने वारे वाहणार आहेत. तर 16 ते 20 जुलैदरम्यान गुजरातच्या किनार्यावर आणि पश्चिम मध्य नैऋत्य अरबी समुद्रावर 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या भागात मच्छिमारीसाठी जावू नये, असं आवाहन के एस होसाळीकर यांनी केलं आहे. ( ग्लोबल टीचरनी मारली कामावर दांडी! चौकशी समितीने दिलेल्या अहवालामुळे पुन्हा चर्चेत ) महाराष्ट्रात तीन दिवसांनी पुन्हा पाऊस बरसणार मुसळधार पावसाने आता विश्रांती घेतली असली तरी पुढच्या तीन दिवसानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. परंतु अरबी समुद्रातील उत्तर पूर्व भागापासून ते सौराष्ट्र, कच्छच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. या पट्ट्याचे रूपांतर 24 तासांत तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता असल्याने 21 जुलैनंतर पुन्हा राज्यात विशेषत: कोकणात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जुलै महिन्याची सरासरी राज्याने ओलांडली आहे. मात्र, पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. तरीदेखील 19 जुलैपर्यंत काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. दरम्यान, गुजरातची किनारपट्टी ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे.