मुंबई, 16 जुलै: ग्लोबल टीचर (Global Teacher) पुरस्कार मिळालेले रणजीतसिंह डिसले गुरूजी सध्या पुन्हा चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्या चर्चेत असण्याचं कारण हे नसून, थोडं वेगळं आहे. शिक्षक म्हणून कार्यरत असताना, त्यांनी तब्बल 34 महिने कामावरून दांडी मारल्याचं (Ranjitsinh Disale absent form work) एका चौकशी समितीच्या अहवालात समोर आलं आहे. जानेवारीमध्ये डिसलेंना अमेरिकेतील फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली होती. यासाठी सहा महिने अमेरिकेत जाण्यासाठी त्यांनी सुट्टीचा अर्ज दाखल केला होता. जिल्हा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सुट्टीच्या अर्जात त्यांच्या कामासंबंधी पुरेशी कागदपत्रं नव्हती. त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल चौकशी सुरू होती. या पाच-सदस्यीय चौकशी समितीच्या अहवालात आता ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या सहा पानी अहवालाची कॉपी इंडियन एक्स्प्रेसकडे उपलब्ध आहे. रिपोर्टमध्ये धक्कादायक बाबी उघड या अहवालात असं स्पष्ट करण्यात आलं आहे, की 13 नोव्हेंबर 2017 ते 5 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये डिसले त्यांच्या झेडपी शाळेत शिक्षक पदावर कार्यरत नव्हते. शिवाय डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग (DIET), सोलापूर सायन्स सेंटर, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ सोलापूर अशा विविध ठिकाणी जिथे त्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली होती तिथेही ते उपस्थित नव्हते. या इतर ठिकाणी काम करण्यासाठी झेडपी शिक्षकाच्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करण्यात आले होते, तरीही मुख्याध्यापक पदाचा कार्यभार त्यांनी सोडला नाही आणि आर्थिक निर्णय घेणे सुरूच ठेवले. “डिसले यांना झेडपी शिक्षक पदाच्या कामातून 13 नोव्हेंबर 2017 रोजी मुक्त करण्यात आले होते. जेणेकरुन ते 17 नोव्हेंबर रोजी DIETमध्ये आपला पदभार स्वीकारतील. मात्र, DIET मध्ये त्यांनी थेट 5 फेब्रुवारी 2018 रोजी हजेरी लावली. 30 एप्रिल 2020 रोजी त्यांचा तेथील कार्यकाळ संपत होता, त्यानंतर 1 मे 2020 रोजी त्यांनी आपल्या झेडपी पदावर पुन्हा येणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी त्याठिकाणी थेट 6 ऑक्टोबर 2020 रोजी हजेरी लावली. याबाबत त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात असं म्हटलं आहे, की ते सोलापूर सायन्स सेंटरमध्ये कार्यरत होते, मात्र तेथेही त्यांच्या हजेरीचा कोणताही कागदोपत्री पुरावा उपलब्ध नाही.” अशी माहिती या रिपोर्टमध्ये दिली आहे. डिसले यांनी याबाबत पूर्वीच स्पष्टीकरण देताना आपण ऑनलाईन काम करत होतो असं सांगितलं आहे. मात्र, रिपोर्टमध्ये ते कारण स्वीकार करण्यात आले नाही. हा अहवाल सोलापूर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून, अंतिम निर्णय ते घेतील. दरम्यान, डिसले यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. “मी माझं स्पष्टीकरण पूर्वीच दिलं आहे. मला आतापर्यंत अहवालाची प्रत मिळाली नाही.” असं ते म्हणाले. डिसले आणि सोलापूर झेडपी प्रशासन यांच्यामध्ये काही काळापासून खटके उडत आहेत. तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिष्यवृत्तीसाठी डिसलेंनी दिलेला रजेचा अर्ज फेटाळला होता. या महिन्यात त्यांनी आपला राजीनामा दिल्यामुळे हा वाद पुन्हा प्रकाशात आला आहे. आता झेडपी प्रशासनाला यावर कारवाई करण्यासाठी एका महिन्याचा कालावधी आहे. तेव्हा डिसले गुरूजींवर प्रशासन काय कारवाई करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.