मुंबई, 17 नोव्हेंबर : राज्यातील (Maharashtra) शहरी भागात 8 ते 12वी आणि ग्रामीण भागात पाचवी ते 12वीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानंतर आता राज्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरू (School reopen) होण्याची शक्यता आहे. पहिलीपासूनचे वर्ग सुरू कऱण्यास शालेय शिक्षण विभाग अनुकूल असल्याची माहिती समोर आली असून या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची मान्यता मिळाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं वृत्त आहे. (Maharashtra primary school reopen soon)
मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक शाळा सुरू कऱण्याच्या संदर्भात मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, तसेच शिक्षण विभागाचे सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर शालेय शिक्षण विभाग प्राथमिक शाळा सुरू करण्यास अनुकूल असल्याचं बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 15 दिवसांत प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच पुढील महिन्यात किंवा जानेवारी महिन्याच्या शेवटी प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्यात येतील असंही बोललं जात आहे.
वाचा : पुण्यातील तब्बल 800 शाळा अंधारात, वीजबिल न भरल्याने शाळांचा वीज पुरवठा खंडित
सुरू झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत - मुख्यमंत्री
राज्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू झाल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत अशा निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू. शाळा सुरु करुन आपण मुलांच्या विकासाचे, प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. मात्र मुलांची अधिक काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आज जेव्हा सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेत जाणार आहेत. तेव्हा मला माझे शाळेचे दिवस आठवत आहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. मित्रांना भेटण्याची उत्सुकता असायची, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा सर्वात आव्हानात्मक काळ सुरू आहे. मुलं ही फुलासारखी नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते या विषयावर टास्क फोर्सशी नियमीत चर्चा होत असते. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणे कठीण होता असंही ते म्हणाले होते.
शाळा सुरु करतांना वर्ग खोल्यांची दारे बंद नसावीत, हवा खेळती असावी, शाळेंचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. निर्जंतुकीकरण करतांना मुलांच्या आरोग्याला अपाय होणार नाही याची देखील काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले होते.
आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या.पावसाळ्यामुळे तसेच इतर अनेक साथीचे रोग येत आहेत. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेवावे. शिक्षकांना बरे वाटत नसेल आणि शंका आल्यास लगेच कोरोना चाचणी करून घ्यावी अशी सर्व पालक आणि शिक्षकांना या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी विनंती केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: School, महाराष्ट्र