मुंबई, 23 जून : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केलं आहे. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये त्यांनी 42 आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केले आहे. शिंदे यांच्यासोबत किती आमदार आहेत? हा प्रश्न विचारला जात होता. शिंदे 50 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र संध्याकाळपर्यंत राज्यपालांना देतील, असे मानले जात होते. त्यावेळी शिंदे यांनी हे शक्तीप्रदर्शन करत आपल्यासोबत सेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचं दाखवून दिलं आहे.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी १४४ हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे...शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक ५० आमदार आणि भाजपचे समर्थक ११४ आमदार असे मिळुन १६४ आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करून राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.
शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आणखीही काही आमदार शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचं समोर येत आहेत. अशात आता नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेच्या शिंदे गटाची आमदार संख्या पन्नासवर पोहोचणार आहे. संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे आपल्या या शिवसेना गटाचं पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर भाजप राज्यपालांना पत्र लिहून सरकार स्थापनेचा दावा करेल. नव्या सोमवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे, शिवसेनेचे अनेक बडे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसला आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आपला हक्क दाखवू शकतात का यावर बरेच तर्क वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान त्यांनी विधिमंडळ गटनेता, पक्ष प्रतोद आणि पक्षांतरबंदी कायद्यानुसार हवे असलेले दोनतृतीयांश संख्याबळ या तांत्रिक मुद्द्यावर पूर्ण केले तर शिंदे गटाची बाजू कायद्याच्या कसोटीवर टिकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.