Oxygen Airlift: राज्यात ऑक्सिजनची कमतरता; उद्धव ठाकरेंची मोदींना साद, इतर राज्यांतून Oxygen एअरलिफ्ट करण्याची मागणी

Oxygen Airlift: राज्यात ऑक्सिजनची कमतरता; उद्धव ठाकरेंची मोदींना साद, इतर राज्यांतून Oxygen एअरलिफ्ट करण्याची मागणी

राज्यातील अनेक ठिकाणी रेमडेसिवीर औषध आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) वाढत असताना दुसरीकडे रेमडेसिवीर औषध (Remdesivir Injection) आणि ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) निर्माण झाल्याचं समोर येत आहे. यामुळेच आता राज्य सरकारने इतर राज्यांतून महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा एअरलिफ्ट करुन मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना अशी मागणी केली असून यासंदर्भात पंतप्रधानांना पत्रही लिहिणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "केंद्र सरकारकडे विनंती केली आहे. सद्यस्थिती पाहता आम्हाला ऑक्सिजनची गरज लागणार आहे. आमच्या येथे जे कारखाने आहेत त्यांना विनंती केली असून ते त्यांच्या क्षमतेने ऑक्सिजन पुरवठा करत आहेत. आम्हाला अधिकचा ऑक्सिजनसाठा मिळण्यासाठी इतर राज्यांतून आणण्यासाठी परवानगी द्या आणि ती वाहतूक सोयीस्कर होईल यासाठीही मदत करा. ईशान्येकडील राज्यांतून ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. मात्र, ही राज्ये खूपच लांब असल्याने पुरवठा होण्यास वेळ लागेल. रस्ते मार्गाने ऑक्सिजन येण्यास उशीर लागणार आणि किती आणणार. त्यामुळे मी पंतप्रधानांना एक विनंती करतोय की, लष्करी तज्ञांची मदत घेऊन जर हवाई वाहतुकीने ऑक्सिजन आणता येत असेल तर एअर फोर्सला सांगून आम्हाला मदत करण्याचे आदेश द्या."

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "येथून टँकर जाणार तेथे ते भरणार आणि मग तेथून येणार. बर असं किती करणार कारण आपल्याला दररोज ऑक्सिजन पुरवठा लागणार आहे. त्यामुळे हवाई मार्गाने लष्कराच्या मदतीने ते शक्य होत असेल तर ते करावं अशी विनंती करत आहोत आणि वैयक्तिक पत्र सुद्धा लिहणार आहे."

वाचा : Maharashtra Lockdown updates: उद्या रात्री 8 वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू, पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री

ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू

राज्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे आणि ऑक्सिजनमुळे नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नालासोपारा येथे 12 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला असल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर नागपूर येथील एका कोविड रुग्णालयात चार रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे.

राज्यात कठोर निर्बंध लागू 

राज्यात उद्या बुधवार दि 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत. राज्यात मार्च 2021 पासून कोविड-19 ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक सहाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठिशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Published by: Sunil Desale
First published: April 13, 2021, 10:20 PM IST

ताज्या बातम्या