Pandharpur: Shiv Sena chief Uddhav Thackeray addreses a party rally at Pandharpur in Maharashtra, Monday, Dec 24, 2018. (PTI Photo) (PTI12_24_2018_000135B)
त्यांनी वचन पाळलं असतं तर काय झालं असतं! असं काय मी मोठं मागितलं होतं… आकाशातले चांद-तारे मागितले होते की काय मागितलं होतं!
मुंबई 03 फेब्रुवारी : मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला मुलाखत दिले. खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले तर मुख्यमंत्र्यांनी ठाकरे पद्धतीने त्याची उत्तर दिलं. या आधी संजय राऊत हे बाळासाहेबांचीही अशीच रोखठोक मुलाखत घेत असतं. राज्यातलं महाआघाडीचं सरकार येवून आता काही महिने होत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तीन पक्षांचं सरकार असल्याने वादही होत आहेत. हिंदुत्व शिवसेनेनं सोडलं असेही आरोप होताहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रश्नांना उत्तर दिलं. बाळासाहेब आणि माँसाहेब म्हणजेच मिनाताई ठाकरे यांच्या आठवणीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गहिवरून गेले.
आज जर माँसाहेब असत्या तर त्यांना काय वाटलं असतं, असा विचार कधी तुम्ही करता का? असा प्रश्न खासदार राऊत यांनी त्यांना विचारला होता त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, माँ कशाला… बाळासाहेब असते तरी त्यांना असं वाटलं असतं की, अरे बापरे! याला हे झेपेल की नाही! माँच्या बाबतीत मातृसुलभ अशी आपल्या मुलाबाबत भावना नक्कीच असली असती. त्याच बरोबरीने कौतुकही नक्कीच असलं असतं. मला झेपेल की नाही असा प्रश्न कधीच पडला नव्हता. मी जे काही करतो ते तळमळीने करतो.
मनापासून करतो. कोणतीही जबाबदारी घ्यायची तर त्या विषयाच्या खोलवर जाऊन अभ्यास करायचा आणि त्यात चांगल्यात चांगले काम करता येईल हाच प्रयत्न करायचा. हा माझा नेहमीचाच प्रयत्न असतो आणि राहणार.
आणखी काय आहे मुलाखतीत?धक्क्यातून सावरलात का?
नाहीच वाटणार. याचं कारण मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे, धक्के द्यायचे प्रयत्न अनेकांनी करून पाहिले, पण कोणालाच ते जमलं नाही. किंबहुना शिवसेनाप्रमुखांनी जे धक्के अनेकांना दिले त्यातनं ते लोक अजूनही सावरलेले दिसत नाहीत. हे क्षेत्र असं आहे की यात धक्का किंबहुना धक्काबुक्की गृहीत धरून चालायचे असते. मघाशी आपण सुरुवात करताना बुद्धिबळाच्या पटाचा उल्लेख केलात. बुद्धिबळ हा बुद्धीने खेळायचा खेळ नक्कीच आहे. पण त्यात विविध सोंगटय़ा किंवा काय म्हणतात… प्यादी, हत्ती, घोडे, राजा, वजीर, उंट या प्रत्येकाच्या चाली जर आपण लक्षात घेतल्या तर बुद्धिबळ खेळणं कठीण आहे असं मला वाटत नाही.
मुख्यमंत्रीपद धक्का होतं का?
नाही. एक लक्षात घ्या. मुख्यमंत्रीपद स्वीकारणं हा माझ्यासाठी धक्का नसला तरी माझं हे स्वप्न कधीच नव्हतं. अत्यंत प्रामाणिकपणानं हे मी कबूल करतो की, मी शिवसेनाप्रमुखांचं एक स्वप्न- मग त्याच्यात ‘सामना’ची निर्मिती असेल, शिवसेनेची वाटचाल असेल आणि माझ्यापुरतं म्हणाल तर मी म्हणजे स्वतः उद्धव याने त्याच्या वडिलांना म्हणजे बाळासाहेबांना दिलेलं वचन! त्या वचनपूर्ततेसाठी मी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं. त्याही पुढे जाऊन मी एक गोष्ट स्पष्ट करतो की, माझं मुख्यमंत्रीपद ही वचनपूर्ती नाही, तर वचनपूर्तीच्या दिशेने टाकलेलं ते एक पाऊल आहे. ते पाऊल त्या दिशेने टाकताना मी मनाशी ठरवलेय की कोणत्याही थराला जायचं, पण मी माझ्या वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करायचंच आणि ते मी करणारच.
धक्के अनेक प्रकारचे असतात. लोकांना हे पटलंय की नाही पटलंय, आवडलंय का नाही आवडलंय हा महत्त्वाचा भाग आहे. मी अनेकदा या विषयावर बोललोय आणि जनतेलाही ते पुरेसं कळलंय. वचन देणं आणि वचन निभावणं यात फरक आहे. वचनभंग झाल्यावर साहजिकच दुःख आहे, रागही आहे. ‘त्यांनी’ कशासाठी हे केलं? का वचन दिलं आणि का वचन मोडलं? मग त्यांनी अशा पद्धतीने वचन मोडल्यानंतर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
भाजप धक्क्यातून सावरला का?
मला माहिती नाही. पण माझं त्यांना असं म्हणणं आहे की, त्यांनी वचन पाळलं असतं तर काय झालं असतं! असं काय मी मोठं मागितलं होतं… आकाशातले चांद-तारे मागितले होते की काय मागितलं होतं! मी तर लोकसभा निवडणुकीच्या आधी आमच्या वाटाघाटी झाल्या तेव्हा जे आमच्यात ठरलं होतं तेवढंच मागितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.