मुंबई, 11 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet Expansion) झाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra State Cabinet Expansion) होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा (Maharashtra Assembly speaker) राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. या पदावर सुद्धा निवड होणार असून आता मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच दोन नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत दिले होते. त्यामुळे संजय राठोड हे राज्य मंत्रिमंडळात कमबॅक करणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.
यासोबतच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे या जागेवर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नावाबाबतही काँग्रेस पक्षात चर्चा सुरू आहे. नितीन राऊत यांना विधानसभा अध्यक्षपद आणि प्रणिती शिंदेंना एखादं राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी सोलापूर येथे म्हटलं, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षवाढीसाठी खूपकाही केलं आहे. त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या सुद्धा सातत्याने निवडून येत आहेत आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसकडून त्यांना मंत्रिपद देण्यात येईल असा मला विश्वास आहे.
संजय राठोड यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान देण्याबाबत उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता संजय राठोड यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राठोड यांनी म्हटलं, माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Mumbai, Sanjay rathod