मुंबई, 03 डिसेंबर : मुंबईत खारमध्ये एका कोरियन युट्यूबर तरुणीची छेड काढल्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. तरुणीची छेड काढत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेनंतर आता तरुणीने मुंबईतील दोन तरुणांनी आपल्याला मदत केल्याचंही सांगितलं आहे. आता या गोष्टीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. कोरियन तरुणीची दोन तरुण छेड काढत असताना एक मुलगा येऊन तिची सुटका करतो. त्यानतंर दुसऱ्या एका तरुणाने या घटनेचा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचवला आणि आरोपींना पकडण्यास आणि कोरियन महिलेला मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या मदतीबद्दल कोरियन तरुणीने आता त्या तरुणांचे आभार मानले आहेत. हेही वाचा : ‘आज देश या विकृत लोकांच्या तावडीत गेला’, उदयनराजे थेट बोलले युट्यूबर असणारी कोरियन तरुणी मुंबईत आली होती. लाइव्ह स्ट्रिमिंगद्वारे ती मुंबईतील आपले काही अनुभव शेअर करत असतानाच तिची छेड काढण्याचा प्रकार घडला. दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने तिच्याशी जबरदस्तीने बोलायला सुरुवात केली. त्यानंतर शरिराशी लगट करत तरुणाने तरुणीच्या गालाला स्पर्श केला. तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत तरुणीने तिथून काढता पाय घेतला. तेव्हा दुचाकीवरील दोन्ही तरुण पुन्हा तिच्या मागे लागले आणि दुचाकीवर बसण्याचीही जबरदस्ती करत होते.
Lunch with two Indian gentlemen who help me to post the video and save me on the street👍
— Mhyochi (@mhyochi) December 2, 2022
Aditya & Atharva pic.twitter.com/Cu9IYOjBMb
तरुणीची छेड काढत असताना तिथे अथर्व नावाच्या तरुणाने त्या दोघांना थांबवत तरुणीला हॉटेलपर्यंत पोहोचवलं. त्यानंतर युटयूबवर लाइव्ह असलेला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आदित्य नावाच्या तरुणाने हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. हेही वाचा : ‘बिनडोक राज्यपाल चालणार नाही’, उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला फटकारलं पोलिसांनी आदित्यसह कोरियन तरुणीशी ट्विटरवर संपर्क साधला आणि सुमोटो दाखल करून अटकेची कारवाई केली. यासाठी आदित्य आणि अथर्व यांची तरुणीला मोलाची मदत झाली. या सर्व मदतीबद्दल कोरियन तरुणीने दोन्ही तरुणांचे आभार मानले आणि त्यांना हॉटेलमध्ये जेवणासाठी आमंत्रित केलं. कोरियन युट्यूबर तरुणीने तिघांचा फोटोही ट्विट केला असून आदित्य आणि अथर्व यांचे आभार मानले आहेत.