मुंबई, 31 डिसेंबर: पियूष जैन (Piyush jain IT Raid) यांच्यानंतर आता परफ्युम व्यावसायिक पुष्पराज जैन यांच्या उत्तर प्रदेश आणि मुंबईतील विविध ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी (Pushparaj Jain IT Raid) सुरू केली आहे. पुष्पराज जैन हे कन्नौजमधून समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) विधान परिषदेचे सदस्य आहेत. पुष्पराज जैन हे परफ्यूम व्यावसायिकासोबत पेट्रोल पंप आणि कोल्ड स्टोरेजचे मोठे व्यापारी मानले जातात. ते कन्नौजमधील मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाकडून पुप्षराज जैन यांच्या उत्तर प्रदेश आणि मुंबईतील जवळपास 50 ठिकाणी छापेमारी केली आहे. आयकर विभागाने पियूष जैन यांच्या घरावर छापेमारी केली असताना पुष्पराज जैन यांचंही नाव पुढे आलं होतं. विशेष म्हणजे पुष्पराज जैन यांनी 'समाजवादी पार्टी' नावाचं परफ्युम लाँच केलं होतं. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.
हेही वाचा- Piyush Jain IT Raid : तळघरातून, भिंतीतून आणि कपाटांमधून निघतायंत कॅश आणि सोनं! पाहा PHOTOS
पुष्पराज जैन यांच्या 50 ठिकाणांवर छापेमारी केल्यानंतर, आयकर विभागाकडून मुंबईतील चार बँक खात्यांबाबत तपास केला जात आहे. संबंधित चारही खाती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बोरिवली शाखेची असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकेसोबत खाजगी बँक (HDFC) मध्ये पुष्पराज जैन यांचं करंट खातं आहे. याशिवाय कन्नौज शहर शाखेतील चार एसबीआय बचत खात्यांसह एकूण 6 खात्यांची झडती घेतली जात आहे.
हेही वाचा- Exclusive Video: पियूष जैनचं कोट्यवधींचं घबाड, घराच्या या कोपऱ्यात लपवला होता खजिना
याशिवाय मुंबईतील मालाड परिसरातील एका निवासी सोसायटीच्या पत्त्यावर पुष्पराज ऊर्फ पम्मी जैन यांची एक कंपनी नोंदणीकृत आहे. Adijin Perfumes Private Limited असं या कंपनीचं नाव आहे. आज सकाळी जेव्हा आयकर अधिकारी याठिकाणी पोहोचले, तेव्हा त्याठिकाणी कंपनीचं कार्यालय नसल्याची माहिती समोर आली आहे. या फ्लॅटमध्ये एक कुटुंब भाडेकरू म्हणून राहत आहे. ऑफिस नसल्याची माहिती समोर आल्यानंतर आयकर विभागाचे अधिकारी घटनास्थळावरून परत आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Income tax, Mumbai, Raid