पीयूष जैन यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर इतकी रोकड सापडली की अधिकाऱ्यांना त्यांची मोजणी करणंही कठीण झालं. 24 डिसेंबरपासून सुरू झालेल्या कारवाईला दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. अजूनही कारवाई सुरूच आहे. पलंग, भिंती, कपाट आणि तळघरांमध्ये अफाट रोकड भरलेली होती. सर्वत्र नोटा आणि सोन्याच्या वीटा पाहून आयकर अधिकारीही अचंबित झाले.
डीजीजीआयने कन्नौज येथील पियुष जैन यांच्या कारखान्यावर छापा टाकला तेव्हा तेथे भूमिगत टाकी सापडली. या सीलबंद टाकीत 17 कोटींची रोकड आणि 23 किलो सोनं सापडलं आहे. सोन्यावर आंतरराष्ट्रीय चिन्ह आहे. छाप्यादरम्यान संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त होता. या कारवाईनंतर पियुष जैन याला अटक करण्यात आली.
अत्तर व्यापारी असलेल्या पियुष जैन यांच्या सर्व निवासस्थानांवर आणि गोदामांवर आयकराने छापे टाकल्यानंतर ही कारवाई चर्चेत आली आहे. आयटी आणि जीएसटी विभागाने केलेल्या कारवाईत 187 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. CGST कायद्याच्या कलम 67 अंतर्गत पियुष जैनला अटकही करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर पियुषला न्यायालयात हजर करण्यात आले, त्यात त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.