मुंबई, 12 जून : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) शिवसेनेचा दुसरा उमेदवार पराभूत झाल्यामुळे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Independent MLA Devendra Bhuyar) यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला होता. अखेरीस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे या वादावर पडदा पडला आहे. आमदार भुयार यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आहे. शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार (Shiv Sena candidate Sanjay Pawar)पराभूत झाल्यानंतर अपक्ष आमदार आणि लहान पक्षांच्या आमदारांनी दगाफटका करत भाजपला मतदान केल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. अमरावतीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्या नावाचा उल्लेख राऊत यांनी केला होता. त्यानंतर आज भुयार यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर भुयार यांनी संजय राऊत यांची मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं, याची माहिती भुयार यांनी दिली. आपण भाजपला मतदान केलं नाही, असा खुलासा भुयार यांनी राऊत यांच्याकडे केला. दरम्यान, काही वेळापूर्वी सिल्व्हर ओकवर जाऊन भुयार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. ‘पवार साहेबांच्या समोर मी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत माझ्या व्यथा बोलून दाखवल्या होत्या. त्यामुळे सेनेच्या पराभवाचे कारण मला ठरवले गेले. ते मी शरद पवारांना सांगितले. तर हा प्रकार गैरसमजातून घडलं आहे, असं शरद पवारांनी सांगितल्याचं भुयार म्हणाले. ( ISO प्रमाणपत्र मिळालं म्हणजे काय होतं? प्रत्येक व्यावसायिक त्याचा इतका का टेंभा ) ‘मी पहिल्या दिवसापासून प्रयत्न करतोय. पवार साहेबांनी वेळ दिली मी भेटलो. आता मी मुख्यमंत्र्यांना वेळ मागितली आहे. ‘निधी देवू नका पण भेटायला वेळ द्या’ असं मी म्हटलं आहे. आम्हा अपक्षांबद्दल मतभेद निर्माण केले जात आहे. आमच्या बद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे, असंही भुयार म्हणाले. ( IND vs SA: लाजिरवाण्या पराभवानंतर पंत घेणार कठोर निर्णय! या दोघांना मिळणार संधी ) ‘पवार साहेबांना विश्वास आहे आमच्यावर, मी आधीपासून त्यांच्यासोबत आहे. आम्ही महाविकास आघाडीबरोबर आहोत आणि राहणार आहोत. विधान परिषदेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचा विजय होईल, असा दावाही भुयार यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.