Home /News /mumbai /

यात काही चुकत असेल तर पंतप्रधान मोदींनीच सांगावे, राऊतांचा थेट सवाल

यात काही चुकत असेल तर पंतप्रधान मोदींनीच सांगावे, राऊतांचा थेट सवाल

'‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे'

    मुंबई, 13 सप्टेंबर : 'मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे; मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचाच एक भाग आहे. मुंबईस पाकिस्तान म्हणणारी एक नटी, मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे म्हणणारा एक वृत्तवाहिनीचा संपादक यांच्या मागे कोण आहेत?' असा सवाल करत शिवसेनेनं केलेल्या आंदोलनात काही चूक असेल तर पंतप्रधान मोदींनीच सांगावे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे चौफेर तोफ डागली. 'महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले आहेत. हे ग्रहण ‘उपरे’ लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणे आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईस पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्य़ा एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेने कारवाई करताच महापालिकेचा उल्लेख ‘बाबर’ असा करण्यात आला. मुंबईला आधी पाकिस्तान, नंतर बाबर म्हणणाऱ्य़ांच्या मागे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष उभा राहतो हे दुर्दैवच म्हणायला हवे' अशी जळजळीत टीका राऊतांनी भाजपवर केली. 'आशिष शेलारांचा अभ्यास कच्चा' मुंबईविरोधात 60-65 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काही नेत्यांनी पद्धतशीर कारस्थाने केली. त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय ठेवून मराठी माणसाने संयुक्त महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकवला. भाजपचे एक प्रमुख नेते आशिष शेलार यांचे असे म्हणणे आहे की, ‘ज्या काँग्रेसने मराठी आंदोलकांवर गोळ्या झाडल्या त्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत कशी?’ भाजप नेत्यांचा इतिहास कच्चा आहे. मोरारजी देसाई त्या वेळी मुख्यमंत्री होते. गोळीबाराचे आदेश त्यांचेच होते. देसाई यांच्या आदेशाने जशी मुंबईत मराठी माणसे शहीद झाली तशी गुजरातमध्येही 16 गुजराती बांधव शहीद झाले. आता इतिहास असे सांगतो की, हेच मोरारजी देसाई पुढे काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी स्वतःची वेगळी काँग्रेस काढली. हेच देसाई पुढे देशाचे पंतप्रधान झाले व त्यांच्या मंत्रिमंडळात अटलबिहारी वाजपेयींपासून लालकृष्ण अडवाणींपर्यंत सर्व जनसंघीय दिग्गज सामील झालेच होते. खरे तर हा इतिहास आता खरवडून कशासाठी काढायचा? प्रत्येक इतिहासाला एक काळी बाजू असतेच. काँग्रेसने म्हणजे मोरारजी देसाई यांनी गोळीबार केला त्याच्या निषेधार्थ केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा पंडित नेहरूंच्या तोंडावर फेकणारे चिंतामणराव देशमुख हेसुद्धा तेव्हा काँग्रेसवालेच होते व महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे सक्रिय समर्थक होते, असं सांगत राऊतांनी आशिष शेलारांना सणसणीत टोला लगावला. सेनेविरोधात बोलणारा भाजपची 'डार्लिंग' 'मुंबई मूळची कोळी, आगरी, भंडारी, पाचकळशी, पाठारे प्रभू वगैरे समाजाची असेल. म्हणजेच मराठी माणसाची असेल; पण तिला धनकनक संपन्न आम्हीच केले, ही घमेंड, अहंकार मुंबईतील शेठ लोकांत तेव्हाही होता, आजदेखील आहेच. हीच घमेंड उतरवण्याचे काम सर्वांत आधी शिवसेनेने केले. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात दिल्लीच्या मनात कायम द्वेषभावना राहिली. जो शिवसेनेविरोधात बोलेल तो दिल्लीश्वरांची ‘लाडकी डार्लिंग’ होत असते. राजस्थानातील महाराणा प्रतापाचे वंशज व महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘मर्‍हाठा’ वंशज यांच्या शौर्याच्या आणि स्वाभिमानाच्या बाबतीत कधीच शौर्य न गाजवलेल्या सध्याच्या राजकीय पिढीने नेहमीच आकस ठेवला हे आताही दिसत आहे' असंही राऊत म्हणाले. खासदारांनी राजीनामा का दिले नाही? 'मुंबईस पाकिस्तान व महापालिकेस बाबराची सेना असे बोलणाऱ्य़ांच्या मागे महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष उभा राहतो हे विचित्र आहे. पण सुशांत आणि कंगनास पाठिंबा देऊन त्यांना बिहारच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. बिहारातील उच्चवर्णीय राजपूत, क्षत्रिय मते मिळविण्यासाठी हा खटाटोप आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा अवमान झाला तरी चालेल. हे धोरण ‘राष्ट्रीय’ म्हणवून घेणाऱ्य़ांना शोभणारे नाही. महाराष्ट्राचा अवमान केला म्हणून दिल्लीतील एकाही मराठी केंद्रीय मंत्र्यास वाईट वाटले नाही तेथे संतापून राजीनामा वगैरे देण्याची बातच सोडा' असा टोलाही राऊतांनी लगावला.  राज  हे ‘ठाकरे ब्रॅण्ड’चे एक घटक '‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल' अशी चिंताही राऊतांनी व्यक्त केली. बॉलिवूड आणि अक्षयकुमार गप्प का? 'एक नटी मुंबईत बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध एकेरी भाषेत बोलते. आव्हानाची भाषा करते व त्यावर महाराष्ट्राच्या जनतेने काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही हे कसले एकतर्फी स्वातंत्र्य? तिच्या बेकायदेशीर बांधकामावर हातोडा पडला तेव्हा हे तर माझे राममंदिरच होते, असा कांगावा तिने केला. पण हे बेकायदेशीर बांधकाम तिने कायद्याचे उल्लंघन करून ती सांगत असलेल्या ‘पाकिस्ताना’त बांधले. मुंबईला पाकिस्तान बोलायचे व या ‘पाकिस्ताना’तल्या बेकायदेशीर कामांवर सर्जिकल स्ट्राईक केला की छाती पिटायची, हा कसला खेळ? संपूर्ण नव्हे, निदान अर्ध्या हिंदी सिनेसृष्टीने तरी मुंबईच्या अवमानासंदर्भात व्यक्त व्हायलाच हवे होते. कंगनाचे मत हे संपूर्ण सिनेसृष्टीचे मत नाही, असे सांगायला हवे होते. निदान अक्षय कुमार वगैरे मोठय़ा कलावंतांनी तरी समोर यायला हवे होते. मुंबईने त्यांनाही दिलेच आहे. मुंबईने प्रत्येकाला दिले आहे. मुंबईचा अवमान होत असताना ते सगळेच खाली मान घालून बसतात' असं म्हणत संजय राऊतांनी अक्षय कुमारलाही टोला लगावला.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Samana, Sanjay raut

    पुढील बातम्या