मुंबई, 21 जून : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी (dharavi), जी भारतातील कोरोनाच हॉस्पॉट झाली. धारावीमध्ये कोरोनाव्हायरसने आपले हातपाय पसरले आणि मग फक्त राज्याचीच नव्हे तर देशाचीही चिंता वाढली. कारण अशा भागात कोरोनाव्हायरसला आळा घालणं म्हणजे अशक्यच होतं. मात्र हे मोठं आव्हान राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेनं पेललं. आज एकेकाळी जी धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट होती तिच आता मॉडेल बनली असं म्हणण्यास हरकत नाही. कोरोनाव्हायरसशी नेमकं कसं लढावं याचा आदर्श धारावीने घालून दिला आहे. मुंबईमध्ये कोरोनाव्हायरसची सर्वाधिक प्रकरणं धारावीत होती. झपाट्याने कोरोनाने धारावीला आपल्या विळख्यात घेतलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून धारावी कोरोनाला हरवताना दिसते आहे. धारावीची आजची आकडेवारी पाहता एकूण 2170 कोरोना रुग्ण आहेत. दिवसभरात कोरोनाचे फक्त 12 रुग्ण आढळून आलेत. तर दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. हे वाचा - 81 देशांमध्ये कोरोनाव्हायरसची दुसरी लहर; WHO ने व्यक्त केली चिंता या ठिकाणची कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी झाली आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला आहे. धारावीत एप्रिलमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा 18 दिवस होता. मे महिन्यात 43 दिवस झाला तर आता जूनमध्ये तो तब्बल 78 दिवस झाला आहे. काय होती आव्हानं? धारावीमध्ये 80 टक्के लोकसंख्या सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून होती. 10 बाय 10 खोलीत 8 ते 10 लोकं राहतात. ग्राऊंड फ्लोरला घरं आणि त्याच्या वरच्या मजल्यावर कारखाने अशा ठिकाणी सोशल डिसन्सिंगचं पालन करणं कठीण होतं. धारावीत कोरोनावर कसं नियंत्रण मिळवलं? मुंबई महापालिकेने चार मॉडेलवर काम केलं, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिट्रिंग. 47,500 लोकांच्या घरोघरी जाऊन डॉक्टर आणि प्रायव्हेट क्लिनिकनी घरोघरी जाऊन तपासणी केली. मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून 4,76,775 लोकांची स्क्रिनिंग करण्यात आली. वयस्कर आणि ज्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे, अशा व्यक्तींसाठी फिव्हर क्लिनिक सेटअप करण्यात आले, जिथं 3.6 लाख लोकांची तपासणी झाली. धारावीत एकूण 5,48,270 लोकांची तपासणी झाली आणि संशयितांना कोविड केअर सेंटर्समध्ये पाठवण्यात आलं तर 90 टक्के रुग्णांवर धारावीतच उपचार झाले. संपादन - प्रिया लाड हे वाचा - आकाशातून पडली रहस्यमयी वस्तू; लोक म्हणाले, ‘हा एलियनचा मास्क’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.