मोठी बातमी.. मुंबईत विक्रमी तापमानाची नोंद, पारा 38.1 अंश सेल्सियसवर

मोठी बातमी.. मुंबईत विक्रमी तापमानाची नोंद, पारा 38.1 अंश सेल्सियसवर

थंडी कमी होताच आता मुंबईचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई शहरातील आजचं (सोमवार) तापमान 38.1 अंश सेल्सियस इतकं नोंदवण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई,17 फेब्रुवारी: थंडी कमी होताच आता मुंबईचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई शहरात आज (सोमवार) विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 38.1 अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे.

फेब्रुवारी महिन्यातील मागच्या 10 वर्षांतील तिसरं उच्चतम तापमान असल्याचे तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. फेब्रुवारी महिन्यातील सामान्य तापमानाच्या तुलनेत सोमवारचं तापमान जवळपास 7 अंश सेल्सियसने जास्त होतं. सांताक्रुझमध्ये 38.1 तर कुलाब्यात 34.7 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आलं. फेब्रुवारीतील आतापर्यंत सगळ्यात जास्त तापमान 1966 साली 39.6 इतकं नोंदवलं गेलं होतं.

दरम्यान, गेल्या 13 फेब्रुवारीला अंटार्क्टिकाला ग्लोबल वॉर्मिंगचा चांगलाच तडाखा बसला होता. अंटार्क्टिकामध्ये सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं होतं. अर्जेंटिनाच्या एका संशोधन तळावरच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, इथे 18.3 अंश सेल्सियसची नोंद झाली. याआधी इथे 0.8 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं होतं. अंटार्क्टिकाच्या उत्तर टोकावर इस्पेरान्झामध्ये मार्च 2015 मध्ये 17.5 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं होतं. अर्जेंटिनाच्या हवामानशास्त्र विभागाने ट्वीट करून ही माहिती दिली. या संशोधन तळावर 1961 पासूनची आकडेवारी आहे. त्याचाच आधार घेऊन तापमानाबद्दलची ही रेकॉर्ड ब्रेक माहिती देण्यात आलीय.

अंटार्क्किटाच्या द्वीपसमूहाचा दक्षिण अमेरिकेच्या बाजूचा जो भाग आहे तिथे तापमान वेगाने वाढतं आहे. गेल्या 50 वर्षांत इथल्या तापमानात 3 अंश सेल्सियसची वाढ झालीय. या भागातल्या जवळपास सगळ्याच हिमनद्या वितळत चालल्या आहेत. संपूर्ण जगालाच हवामान बदल आणि तापमानवाढीचा फटका बसला आहे.

अंटार्क्टिकामधल्या हिमनद्या वितळत असल्याने समुद्राच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते अंटार्क्किटाचं वाढतं तापमान ही अतिशय चिंतेची बाब आहे.अशा पद्धतीने बर्फ वितळण्याचं प्रमाण वाढत चाललं तर अंटार्क्किटावरचं बर्फ नाहिसं होण्याचा धोका आहे. ग्रीनलँडमध्येही तापमानवाढीमुळे बर्फ आक्रसत चाललं आहे.

मुंबईमधली थंडी आता कमी झालीय पण हिवाळ्यामध्ये मुंबईचं तापमान खाली आली होतं. याच तापमानाची तुलना अंटार्क्टिकाच्या तापमानाशी करण्यात आली होती. जागतिक तापमानवाढीबद्दल हा मोठा इशारा आहे.

First published: February 17, 2020, 10:30 PM IST

ताज्या बातम्या