मुंबई, 30 सप्टेंबर : महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy to heavy rainfall in Maharashtra) अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. शेतीचंही प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. राज्यात झालेल्या या अतिवृष्टीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांना तातडीची मदत जाहीर (Immediate help) करण्याचीही मागणी केली आहे.
50 हजारांची मदत तातडीने जाहीर करा
राज ठाकरेंनी म्हटलं, "महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे. परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला, शेतकऱ्याला 50,000 रुपयांची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ मदत द्यावी. आधी कोरोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी पार कोलमडला आहे अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे."
शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची राज्य सरकारकडे आग्रही मागणी.@CMOMaharashtra pic.twitter.com/fnCIswerMO — MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 29, 2021
राज्यात पावसाचं थैमान; आतापर्यंत 436 जणांचा बळी तर 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान
राज ठाकरेंनी आपल्या पत्रकात पुढे म्हटलं, "प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत राहतील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल. परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पाहण्याची ताकद आत्ता शेतकरी बांधवांकडे नाही, ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी मी ह्या पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे करत आहे."
"शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढू, धीर सोडू नका" मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश त्यांनी दिले. काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्रामस्थांची सुटका केली आहे, तसेच या भागातून लोकांचे स्थलांतर व्यवस्थित व्हावे असेही त्यांनी आज सांगितले. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असे सांगितले.
नुकसानीचे पंचनामे सुरू करा
सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत असेही निर्देश त्यांनी दिले. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहेत, शेतपिक वाहून गेले आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका
निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे, याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहचावा तसेच नवीन तारखांबाबत माहिती द्या असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rain, Raj Thackeray, महाराष्ट्र