मुंबई, 2 डिसेंबर : भारतात अखेर कर्नाटकमार्गे कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) नावाच्या नव्या विषाणूचा शिरकाव झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातही (Maharashtra) प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाकडून या संकटाला थोपविण्यासाठी युद्ध पातळीवर काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत विदेशातून आलेल्या एकाही रुग्णाचा जिनोम सिक्वेन्ससाठीचा नमूनाचा अहवाल समोर आलेला नाही. त्यामुळे अद्यापतरी राज्यात या नव्या विषाणूचा शिरकाव झालेला नाही, असं बोललं जातंय. पण राज्याची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. आतापर्यंत राज्यातील 28 नमुने हे जिनोम सिक्वेन्ससाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल येण्यास थोडा वेळ लागतो. राज्यातील विविध भागातील रुग्णांचे नमूने पुण्यात जिनोम सिक्वेन्सिंग पाठवण्यात आले आहे. सध्या मुंबई आणि पुण्यात जिनोम सिक्वेन्सिंगचं काम सुरु असल्याची माहित राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान, आतापर्यंत 76 आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आले असून त्यापैकी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या दोघांचे उद्या किंवा परवा रिपोर्ट येतील, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
हेही वाचा : भारतात ओमायक्रोनचा शिरकाव, महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दोन रुग्ण
महाराष्ट्रात आतापर्यंत 9 आंतराष्ट्रीय प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी पहिला रुग्ण हा 10 नोव्हेंबर रोजी लंडनमधून आलेला 21 वर्षीय तरुण आहे. तर दुसरा रुग्ण हा 13 नोव्हेंबरला लंडहून आलेला आहे. तिसरा रुग्ण हा 17 नोव्हेंबरला लंडनहूनच आलेला आहे. या रुग्णाचं वय 66 वर्ष इतकं आहे. त्यानंतर 25 नोव्हेंबरला मॉरिशस, पोर्तूगाल, दक्षिण आफ्रीका, पोर्तुगाल या देशांमधून आलेल्या रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर लंडनहून आलेले 2 आणि जर्मनीहून आलेल्या एका प्रवाशाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सर्व रुग्णांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांचे नमून जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.
कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूने भारतात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोन जणांना ओमायक्रोनची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय तपासातून समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. कर्नाटकात 66 आणि 46 वर्षांच्या दोन व्यक्तींना ओमायक्रोन विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. विशेष म्हणजे जगभरात जे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत त्यांच्यातदेखील आतापर्यंत सौम्य लक्षणे आढळले असल्याची माहिती समोर आल्याचं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.