मुंबई, 14 नोव्हेंबर : 'भाजपसोबत आम्ही 25 वर्ष सत्तेत होतो. त्यांच्यासोबत एक भावनिक आणि जिव्हाळ्याचे नाते होते. एका विचाराने दोन्ही पक्ष एकत्र होते. 25 वर्षांच्या संसार मोडून दुसऱ्या पक्षासोबत जायचे म्हटल्यावर दु:ख तर होणारच आहे', असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले आहे.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (kunal kamra) याने 'शटअप या कुणाल' (shut up kunal kamra) या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी संजय राऊत यांनी आपल्या शैलीत चौफेर फटकेबाजी केली. तसंच, सुशांत सिंह राजपूत, कंगना राणावत, अर्णब गोस्वामी प्रकरणावर संजय राऊत यांनी परखड मत व्यक्त केले.
सुशांत सिंह राजपूतला मी बिहारचा आहे, हे मानत नाही. तो मुळात मुंबईचा होता. त्याला बिहारमध्ये कोण ओळखत होतं. त्याला खरी ओळख ही मुंबईने दिली. तो मुंबईचा मुलगा होता, त्याला न्याय देणे ही आमची जबाबदारी आहे. मात्र, ओरडून सत्य लपणार नाही, असंही राऊत म्हणाले.
सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी योग्य तपास केला होता. मुंबई पोलीस हे देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस दल आहे. मुंबई पोलिसांनी जो तपास केला होता, तो योग्य होता. पण त्यांच्यावर आरोप केले गेले, पोलिसांना माफिया म्हटलं गेलं. हे अत्यंत चुकीचे होते. मुंबई पोलीस हे शहराचे रक्षण करताय हे लक्षात ठेवा, असा अप्रत्यक्ष टोलाही राऊत यांनी भाजप आणि कंगनाला लगावला.
'पापा को छोड दो', वडिलांना सोडवण्यासाठी चिमुकलीनी पोलिसांच्या गाडीवर आपटलं डोकं
तसंच, अभिनेत्री कंगना रानौत हीने मी मुंबईत येत आहे, काय उखाड्याचे ते उखाडून घ्या, अशी धमकीच दिली होती. त्यामुळे मुंबई पालिकेनं अनधिकृत बांधकाम तोडून फक्त तिची इच्छा पूर्ण केली होती, म्हणून सामनाच्या अग्रलेखात तसे शिर्षक देण्यात आले होते, असा टोलाही राऊत यांनी कंगनाला लगावला.
मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणे हे योग्य ठरणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी आर्थिक परिस्थितीत पाहून आरक्षण द्यावे अशी भूमिका मांडली होती. जातीवर आरक्षण देऊ नये, असं त्यांनी जाहीर सभेत सांगितले होते. त्यामुळे आता परिस्थिती ही बदलेली आहे. जो मराठा समाजातील तरुण आहे, ज्याची परिस्थिती गरीब आहे, त्याला शिक्षण घेता येत नाही, त्याला आरक्षण मिळाले पाहिजे आणि अनेक वर्षांपासून दलित समाज आरक्षण घेत आला आहे, त्यांनी कधी तरी आरक्षण सोडले पाहिजे, असंही राऊत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.