मुंबई, 26 जून: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Maharashtra Home minister Anil Deshmukh) यांच्या दोन्ही पीएना अटक करण्यात आली आहे. ईडीनं ही कारवाई केली आहे. कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे (Kundan Shinde and Sanjeev Palande ) अशी दोन्ही पीएची नावं आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. (Money Laundering Case)
दोघांची वैद्यकीय चाचणी करुन आज सकाळी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या दोघांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. बार मालकांच्या जबाबानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकत अनिल देखमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुली करण्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर या संपूर्ण प्रकरणात संजीव पलांडे यांच्या नावाचाही उल्लेख झाला होता. अनिल देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. मात्र, या प्रकरणावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे.
शुक्रवारी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपूरच्या निवासस्थानासह मुंबईतल्या ज्ञानेश्वरी, सुखदा या निवासस्थानी ईडीच्या पथकाने छापेमारी (ED raid) केली. ईडीच्या पथकाने मुंबईत अनिल देशमुखांच्या निवासस्थानी सात तासांहून अधिक काळ चौकशी केली.
अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया
या कारवाई संदर्भात आता स्वत: अनिल देशमुख यांनी माध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Anil Deshmukh first reaction after ed action) ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केलं. यापुढेही ईडीला चौकशीत सहकार्य करत राहणार आहे अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
हेही वाचा- Delta Plus नं वाढवली चिंता; केंद्रानं 8 राज्यांना पत्र लिहून केलं अलर्ट, दिल्या महत्त्वाच्या सूचना
अनिल देशमुख म्हणाले, माझ्यावर जे खोटे आरोप केले होते आणि ते सुद्धा परमबीर सिंग यांना पदावरुन हटवण्यात आल्यावर केले होते. परमबीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते आणि त्यांची भूमिका संशयास्पद होती. त्यामुळे त्यांना पदावरुन हटवण्यात आलं. पदावरुन हटवल्यावर त्यांनी आरोप केले. त्यांना आरोप करायचे होते तर आयुक्तपदावर असताना आरोप करायला हवे होते. वाझे, काझींसह पाचही अधिकारी हे थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होते. या प्रकरणी सीबीआय, करत आहे आणि चौकशीत सत्य समोर येईन.
बार मालकांचे जबाब नोंदवले
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील 10 ते 12 बार मालकांचे जबाब नोंदवले आहेत. या बार मालकांनी आपण हप्ता दिल्याची कबुली ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. 10 ते 12 मालकांनी मिळून काही महिने चार कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. या जबाबानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून काल दिवसभर विविध ठिकाणी कारवाई सुरू असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, बार मालकांनी दिलेल्या या जबाबात अनिल देशमुख यांचे नाव घेतले की नाही, तसेच त्यांचा या प्रकरणात संबंध आहे की नाहीये हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. मात्र, परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर ईडीच्या पथकाकडून जी कारवाई सुरू आहे त्यावरुन अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, NCP, Raid