मुंबई 02 जुलै : गेल्या 8 ते 10 दिवसात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक शिवसेना आणि अपक्ष आमदार त्यांच्यासोबत गेले. यामुळे महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. भाजप मुख्यमंत्रीपदासाठी हे सर्व करत आहे आणि देवेद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील, असा अंदाज जवळपास सगळे लावत होते. मात्र ऐनवेळी फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
'नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार', देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, भाजपने हा निर्णय नेमका का घेतला? असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित झाला. अगदी शपथविधीच्या काही तास आधीपर्यंतही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असं सगळ्यांना वाटत होतं. विशेष बाब म्हणजे भाजपच्या आमदारांचं संख्याबळही शिंदे गटापेक्षा भरपूर जास्त होतं. मात्र, भाजपने मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला.
आता समोर आलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, फक्त सामान्य जनतेलाच नाही तर स्वतः एकनाथ शिंदे यांनाही आपण मुख्यमंत्री होणार असल्याची कल्पना नव्हती. एका मुलाखतीमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा केला आहे. तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात, हे तुम्हाला कधी समजलं? असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की 'मला हे सगळं अनपेक्षित होतं. मात्र लोकांमध्ये असा समज होता की भाजप स्वतःला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून फोडाफोडीचं राजकारण करत आहे. हा आरोप त्यांनी खोटा ठरवला. भाजपकडे संख्याबळ जास्त असतानाही त्यांनी माझ्यासारख्या सामान्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला', असंही ते म्हणाले.
फडणवीस उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयार कसे झाले, याचं उत्तरही त्यांनी दिलं. ते म्हणाले, 'भाजपमध्ये शिस्तीला फार महत्त्व असतं. मुख्यमंत्रीपदाबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असता ते म्हणाले, की ज्या पक्षानं मला सर्वोच्च पद दिलं. आज त्याच पक्षाचा आदेश आहे की मी उपमुख्यमंत्रीपद सांभाळायचं आहे. पक्षाचा आदेश मानून त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, New cm