मुंबई, 15 जून : लॉकडाउनच्या काळात गेल्या 2 महिन्यांपासून ठप्प झालेली मुंबई आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल आता रुळावर आली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी मुंबई लोकल वाहतूक आजपासून सुरू झाली आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी खुद्द ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे. 'कोरोनाच्या परिस्थितीत लढा देत असताना रेल्वे विभागाकडून आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे', असं म्हणत त्यांनी अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरू झाली असल्याचं जाहीर केलं आहे.
त्याचबरोबर मुंबईत लोकल सेवाही अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू करण्यात आली आहे. जे कर्मचारी अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावत आहे. अशांना राज्य सरकारने याबद्दल माहिती द्यावी, अशी सूचनाही गोयल यांनी दिली.
In another landmark step in our fight against COVID-19, Railways resumes selected local train services in Mumbai from today, strictly for essential staff as recognised by the State Govt. pic.twitter.com/z77wljR3wi
— Piyush Goyal (@PiyushGoyal) June 15, 2020
असे आहे रेल्वेचे वेळापत्रक आणि नियम
दरम्यान, मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उपनगरीय लोकल आजपासून (15 जून) धावणार आहेत. राज्य सरकारअंतर्गत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही लोकल सेवा सुरू झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर 146 उपनगरीय फेऱ्या धावणार आहेत. त्या चर्चगेट ते डहाणू रोड या मार्गावर धावतील. बहुतांश लोकल या जलद मार्गाने चालविण्यात येतील. सकाळी 5.30 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत सरासरी 15 मिनिटांनी लोकल सेवा सुरू असेल.
बहुतांश लोकल या चर्चगेट ते विरार या दरम्यान धावणार आहे. या लोकल चर्चगेट ते बोरीवली दरम्यान जलद तर त्यापुढे धीम्या गतीने धावतील. तर विरार ते डहाणू या मार्गावर 16 लोकल धावतील. तर दुसरीकडे मध्य रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन अशा 200 फेऱ्या सुरू होणार आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, कर्जत, कल्याण, ठाणे या मार्गांवर 130 लोकल फेऱ्या होतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गावर 70 फेऱ्या होतील. कार्यालयीन वेळांप्रमाणे सकाळी 7, 9, दुपारी 3 सायंकाळी 6, रात्री 9, 11 याप्रमाणे गाड्या चालविण्यात येतील.
...आणि चंद्रकांत पाटलांनी केलं शरद पवारांचं कौतुक, अजितदादांना लगावला टोला
अत्यावश्यक सेवेतील सुमारे 1.25 लाख कर्मचारी या सेवेचा लाभ घेऊ शकतील. मात्र सर्वसामान्य प्रवासी या लोकलने प्रवास करू शकणार नाहीत. या रेल्वे प्रवासासाठी तिकीट काऊंटवर आधी ओळखपत्र दाखवावे लागेल, त्यानंतरच तिकीट दिलं जाईल. रेल्वे आणि राज्य सरकारकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच प्रवास करीत आहेत की नाही याची पडताळणी केली जाईल. यादरम्यान कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल.
संपादन - सचिन साळवे