मुंबई, 17 जुलै : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे काल दिल्लीत (Delhi) दाखल झाले होते. दिल्लीत पोहोचल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून नंतर पहिल्यांदाच अमित शाह यांची देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या दोन तासांच्या बैठकीत राज्यातील सहकार क्षेत्रातील गैरव्यवहारावर चर्चा झाली. येत्या काळात सहकार क्षेत्रातील गैरव्यवहाराची चौकशी अधिक सखोल होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी राज्यातील काही साखर कारखान्यांत गैरव्यवहार झाल्याचं सांगत अमित शहा यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर सहकार मंत्रालय हे अमित शहा यांच्याकडे आलं आणि त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली असून त्यातही साखर कारखान्यांतील गैरव्यवहाराबाबत चर्चा झाली असल्याची सूत्रांकडून माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार राज्यातील सहकार क्षेत्रातील गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. ‘रात्रीतून कोणालाही अटक होऊ शकते’, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांत राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा झाली असून अनिल देशमुख प्रकरणावरही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. कालच ईडीच्या अधिकाऱ्यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. ईडीने अनिल देशमुख यांची 4.2 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







