Home /News /mumbai /

देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला, बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला : एकनाथ शिंदे

देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला, बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला : एकनाथ शिंदे

ठाकरे सरकार कोसळलं असलं तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच शिवसैनिकाला राज्याचा मुख्यमंत्री करण्याची घोषणा फडणवीसांनी केली.

    मुंबई, 30 जून : भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत एकत्र पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. ठाकरे सरकार कोसळलं असलं तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याच शिवसैनिकाला राज्याचा मुख्यमंत्री करण्याची घोषणा फडणवीसांनी केली. एकनाथ शिंदे हे आता राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. ते आज रात्री आपल्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. यावेळी भूमिका मांडताना एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांचे आभार मानले. "देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला. त्यांनी शिवसैनिकाला पाठिंबा दिला. खरंतर त्यांना 120 आमदारांचा पाठिबा होता. पण तरीही त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला", असं एकनाथ शिंदे म्हणाले. "आजच्या काळात ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकसुद्धा अशाप्रकारचा निर्णय घेताना दिसत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर 50 लोक एकत्र येतात. मला काय, मी नगरविकास मंत्री होतो. माझ्या काय अडचणी होत्या ते बाजूला जाऊद्या. पण जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न आणि समस्या त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही तीन-चार वेळा मुख्यमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. अखेर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. राज्याच्या हितासाठी आम्ही हा निर्णय घेतला. आज या निर्णयाबरोबर देवेंद्र फडणवीसांनी जो निर्णय घेतला, 120 चं संख्याबळ त्यांच्याकडे आहे. मुख्यमंत्रीपद तेही घेऊ शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठापण दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला, त्यांच्या मोठेपणाबद्दल त्यांचे, पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो", असं एकनाथ शिंदे म्हणाले. (एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा) "जे काही घडलेलं आहे ते वास्तव आपल्यासमोर आहे. राज्यातील जनतेची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण दिवस-रात्र एक करु. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मोठ्या मनाचं माणूस मिळणार नाही. राज्याच्या विकासासाठी ते आपल्या सगळ्यांच्यासोबत आहेत. आजच्या राजकारणात काय मिळेल हे आपण पाहत असतो. पण मिळत असताना दुसऱ्याला देण्याची त्यांनी जी उदारता दाखवली आहे, अशी उदारता फार दुर्मिळ आहे. मी पुन्हा एकदा मनापासनून सर्वांना धन्यवाद देतो", अशा शब्दांत शिंदेंनी भावना व्यक्त केल्या. "आम्ही जो निर्णय घेतला आहे त्याबाबत मी आपल्याला बोललो आहे की, बाळासाहेबांचे हिदुत्व, त्यांची भूमिका आणि राज्यातील विकास या भूमिका घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. आम्ही जवळपास 50 आमदार एकत्र आहोत. वैचारिक भूमिका, राज्याचा विकास आणि अडीच वर्षात जे काही घडलं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. गेल्या काही काळात आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपल्या मतदारसंघातील समस्या आणि अडचणींची वारंवार माहिती दिली. मीदेखील अनेकवेळा त्यांच्याबरोबर चर्चा केली. आपली जी नैसर्गिक युती होती, आपण एकत्र निवडणूक लढवली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली. मतदारसंघातील प्रश्न आणि येत्या निवडणुकीतील अडचणी विचारात घेऊन निर्णय घेतला आहे. कुणाला काही मंत्रिपद पाहिजे म्हणून हा निर्णय घेतलेला नाही. राज्याच्या हिताच्या दृष्टीने जे काही घडत होते, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर झालेल्या कारवाई, अनेक निर्णय घेता येत नव्हते. काही चांगले निर्णय झाले आहेत. त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे. महाविकास आघाडीमुळे ते काम आधी झालं नाही. 50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात याचा अर्थ त्याचं कारण आणि आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता होती", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या