Home /News /mumbai /

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

एकनाथ शिंंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेवून याबाबतची मोठी घोषणा केली.

    मुंबई, 30 जून : एकनाथ शिंंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेवून याबाबतची मोठी घोषणा केली. "शिवसेनेचे आमदार आमच्यासोबत आले आहेत. अजून काही नेते येत आहेत. सगळ्यांचे पत्र आज आम्ही राज्यपालांना दिले आहेत. भाजपने निर्णय घेतलाय की, आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही आहोत. कुठल्यातरी मुख्यमंत्रीपदाकरता आम्ही काम करत नाहीयत. ही तत्त्वांची लढाई आहे. ही हिंदुत्वाची लढाई आहे. ही विचारांची लढाई आहे. म्हणून भाजपने निर्णय घेतलाय की, एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचा शपथविधी होईल. लवकरच पुढची कारवाई करुन आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करु. यामध्ये शिवसेना आणि भाजपचे आमदार येतील. मी स्वत: बाहेर असेन, पण हे सरकार चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी असेल", अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईत दाखल झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राजभवनावर दाखल झाले. यावेळी फडणवीस आणि शिंदे सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी मोठी घोषणा केली. देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत काय-काय म्हणाले? सर्वांना कल्पना आहे, 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. या युतीच्या माध्यमातून भाजप 105 जागा जिंकली आणि शिवसेना 56 जागा अशा 161 आणि काही अपक्ष मिळून 170 लोकं त्यावेळी निवडून आले होते. साहजिकच युतीचं सरकार स्थापन होईल, अशी आशा होती. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपचा मुख्यमंत्री बनेल, अशी घोषणा केली होती. पण दुर्देवाने निकालानंतर तेव्हाचे आमचे शिवसेना नेत्यांनी वेगळा निर्णय घेतला. विशेषत: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आजन्म ज्यांचा विरोध केला आणि ज्यांनी हिंदुत्वाच्या विचारांचा विरोध केला, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विरोध केला अशा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपला बाहेर ठेवलं. हा खरंतर जनमताचा अपमान होता. जनतेने भाजप-सेना युतीला मतदान केलं होतं, पण त्या जनमताचा अपमान झाला आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीकडून सुरु असलेल्या कामे, आणि प्रचंड भ्रष्टाचार बघायला मिळाले. महाराष्ट्राच्या इतिहासात दोन मंत्री हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणी जेलमध्ये जाणार ही खेदजनक बाब होती. बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे त्याच्याशी संबंधित असलेल्या मंत्री जेलमध्ये जातो तरी त्याला मंत्रिपदावरुन काढला जातो. शेवटच्या दिवशी संभाजीनगर झाली. पण ते कधी झालं? राज्यपालांचं पत्र आल्यानंतर जाताजाता संभाजीनगर, धारावीश, दि.बा. पाटील अशाप्रकारचे निर्णय झाले. त्याला वैध मानले जाणार नाही. पण त्याला आमचं समर्थनच आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आहेत. शिवसेनेच्या आमदारांची कुचंबना झाली. आमच्याच मतदारसंघात आमचे हारलेले विरोधक यांना रोज निधी दिला जात असेल तर आम्ही कशाच्या भरोश्यावर लढायचं, अशा प्रकारचा विषय झाल्यानंतर या सगळ्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची युती तोडा, असा निर्णय घेतला. मात्र, दुर्देवाने उद्धव ठाकरेंनी आमदारांच्या ऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना जास्त महत्त्व दिलं आणि शेवटपर्यंत त्यांचीच कास धरुन ठेवली. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी त्यावर फार बोलणार नाही. एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले? आम्ही जो निर्णय घेतला आहे त्याबाबत मी आपल्याला बोललो आहे की, बाळासाहेबांचे हिदुत्व, त्यांची भूमिका आणि राज्यातील विकास या भूमिका घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. आम्ही जवळपास 50 आमदार एकत्र आहोत. वैचारिक भूमिका, राज्याचा विकास आणि अडीच वर्षात जे काही घडलं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. गेल्या काही काळात आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपल्या मतदारसंघातील समस्या आणि अडचणींची वारंवार माहिती दिली. मीदेखील अनेकवेळा त्यांच्याबरोबर चर्चा केली. आपली जी नैसर्गिक युती होती, आपण एकत्र निवडणूक लढवली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली. मतदारसंघातील प्रश्न आणि येत्या निवडणुकीतील अडचणी विचारात घेऊन निर्णय घेतला आहे. कुणाला काही मंत्रिपद पाहिजे म्हणून हा निर्णय घेतलेला नाही. राज्याच्या हिताच्या दृष्टीने जे काही घडत होते, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर झालेल्या कारवाई, अनेक निर्णय घेता येत नव्हते. काही चांगले निर्णय झाले आहेत. त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे. महाविकास आघाडीमुळे ते काम आधी झालं नाही. 50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात याचा अर्थ त्याचं कारण आणि आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता होती. (मुंबईच्या काळबादेवी परिसरात इमारत कोसळली, घटनेचा थरारक Video समोर) आजच्या काळात ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकसुद्धा अशाप्रकारचा निर्णय घेताना दिसत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर 50 लोक एकत्र येतात. मला काय, मी नगरविकास मंत्री होतो. माझ्या काय अडचणी होत्या ते बाजूला जाऊद्या. पण जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न आणि समस्या त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही तीन-चार वेळा मुख्यमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. अखेर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. राज्याच्या हितासाठी आम्ही हा निर्णय घेतला. आज या निर्णयाबरोबर देवेंद्र फडणवीसांनी जो निर्णय घेतला, 120 चं संख्याबळ त्यांच्याकडे आहे. मुख्यमंत्रीपद तेही घेऊ शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठापण दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला, त्यांच्या मोठेपणाबद्दल त्यांचे, पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो. जे काही घडलेलं आहे ते वास्तव आपल्या समोर आहे. राज्यातील जनतेची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण दिवस-रात्र एक करु. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मोठ्या मनाचं माणूस मिळणार नाही. राज्याच्या विकासासाठी ते आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत. आजच्या राजकारणात काय मिळेल हे आपण पाहत असतो. पण मिळत असताना दुसऱ्याला देण्याची त्यांनी जी उदारता दाखवली आहे अशी उदारता फार दुर्मिळ आहे. मी पुन्हा एकदा मनापासनून सर्वांना धन्यवाद देतो.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या