Home /News /mumbai /

ठाकरे सरकारने उचलबांगडी केलेल्या अश्विनी भिडे पुन्हा मोठ्या जबाबदारीवर परतणार? फडणवीसांचा नेमका प्लॅन काय?

ठाकरे सरकारने उचलबांगडी केलेल्या अश्विनी भिडे पुन्हा मोठ्या जबाबदारीवर परतणार? फडणवीसांचा नेमका प्लॅन काय?

महाविकास आघाडी सरकार कोसळताच सत्तेत आलेल्या नव्या शिंदे-फडणवीस सरकारने शिवसेनेला झटका देण्यासाठी रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई, 1 जुलै : महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळताच सत्तेत आलेल्या नव्या शिंदे-फडणवीस सरकारने शिवसेनेला (Shiv Sena) झटका देण्यासाठी रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आरे कारशेडवरुन (Aarey Carshed) शिवसेनेला पुन्हा डिवचण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. कारण फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयात काल झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरे कारशेडचा मुद्दा मांडला. त्यांनी मेट्रो कारशेड आरेतच व्हावं यासाठी कोर्टात भक्कम बाजू मांडण्यासाठी तयारी करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या, अशी माहिती समोर आली. त्यानंतर आता आणखी एक माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस मेट्रो 3 प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आयएएस अधिकारी अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांची पुन्हा नियुक्ती करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अश्विनी भिडे यांची पुन्हा मेट्रो 3 च्या व्यावस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली तर हा शिवसेनेसाठी देखील धक्का मानला जाऊ शकतो, अशी चर्चा आता रंगली आहे. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाची धुरा आहे त्यांच्यावरच असणार की दुसरं कुणाकडे सोपवलं जाणार याबाबत विविध चर्चा सुरु आहेत. पण वरिष्ठ सूत्रांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाची धुरा सांभाळण्यासाठी पुन्हा एकदा अश्विनी भिडे यांची वर्णी लागू शकते. कारण मेट्रो 3चं काम हे सुरुवातीपासून त्यांच्याकडे होतं. मग काम करत असताना अनेक अडथळ्यांना त्या सामोरे गेल्या. जमीन अधिग्रहन, तसेच अनेक सोसायट्यांची जमीन घेण्यासाठी प्रयत्न, याशिवाय आरे कारशेडला झालेला प्रचंड विरोध या सगळ्या घडामोडींदरम्यान भिडे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यांनी विरोधकांचा विरोध दडपून काढण्यासाठीदेखील प्रयत्न केले होते. त्यामुळे मेट्रोचं काम पुन्हा गतीने होण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारला त्यांच्या नेतृत्वाची गरज लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर मेट्रोची पुन्हा जबाबदारी दिली जावू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अश्विनी भिडे या 1995 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी मेट्रो 3 प्रकल्पाचं सुरुवातीपासून काम पाहिलं आहे. त्या या प्रकल्पाच्या व्यवस्थापकी संचालिका होत्या. त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं. या दरम्यान मेट्रोच्या कारशेडच्या जागेवरुन मोठा वाद उफाळला होता. मुंबईच्या आरे कॉलनीत मेट्रो कारशेड तयार करण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला होता. पण या निर्णयाला पर्यावरण प्रेमींचा विरोध होता. विशेष म्हणजे शिवसेनादेखील फडणवीसांच्या विरोधात उभी राहिली होती. तरीही देवेंद्र फडणवीस मेट्रोचं कारशेड आरेमध्येच करण्यासाठी आग्रही होते. (देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होताच अ‍ॅक्शन मोडमध्ये, ओबीसी आरक्षणासाठी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना) या दरम्यान फडणवीस सरकारचा कार्यकाळ संपला आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यावेळी सरकारने मेट्रोचं कारशेड हे आरे ऐवजी कांजूरमार्गला करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मेट्रो 3 प्रकल्पाच्या व्यवस्थापिक संचालक अश्विनी भिडे या होत्या. मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरुन अश्विनी भिडे आणि ठाकरे सरकार यांच्यात मतभेद झाले. या मतभेदांनंतर अश्विनी भिडे यांची मेट्रो 3 प्रकल्पाच्या व्यावस्थापकीय संचालक पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. त्यांना कोरोना विषाणू व्यवस्थापन समितीत सहभागी करण्यात आलं होतं. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांना मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलं होतं. यानंतर आता राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आहे. त्यामुळे मेट्रोची कामे जलद गतीने करण्यासाठी अश्विनी भिडे यांना पुन्हा मेट्रो 3 च्या व्यवस्थापकीय संचालकपदी आणलं जावू शकतं, असा अंदाज बांधला जात आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या