Home /News /mumbai /

'आमचा सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता तर.. : देवेंद्र फडणवीस

'आमचा सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता तर.. : देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत मिळून भल्या पहाटे राज्यपालांकडे जावून सरकार स्थापनेचा दावा करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

    मुंबई, 15 मे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शनिवारी घेतलेल्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला होता. महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन होण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत मिळून भल्या पहाटे राज्यपालांकडे जावून सरकार स्थापनेचा दावा करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पण ते सरकार त्याच दिवशी कोसळलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेससोबतचं सरकार यशस्वी न होऊ शकल्याचं शल्य भाजपच्या मनात अद्यापही आहे. त्यामुळेच शिवसेनेकडून वारंवार या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला जातो. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? "काय म्हणाले? सकाळचा शपथविधी! अरे सकाळचा शपथविधी केला. पण तो यशस्वी झाला नाही याचा मला आनंद आहे. पण यशस्वी जरी झाला असता ना तरी माझ्या मंत्रिमंडळात कुठला वाझे झाला नसता. माझ्या मंत्रिमंडळात अनिल देशमुख आणि त्या नवाब मलिकाची हिंमत झाली नसती. अरे ज्याक्षणी दाऊदचा साथी मंत्रिमंडळात ठेवायचा की सरकारला लाथ मारायची, ठोकर घालायची? असा विषय आमच्यासमोर आला असता त्यावेळी दाऊदच्या साथीदाराला मंत्रिमंडळात ठेवण्याऐवजी आम्ही त्या मंत्रिमंडळाला ठोकर मारली असती. पण आज त्याचंही समर्थन करत आहेत. वर्क फ्रॉम जेल करत आहेत. त्यांचे फोटो छापले जात आहेत. आणि आम्हाला विचारतात, तुम्ही त्यांच्यासोबत बसले असते का?", असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. (कुणाच्या बापाची औकात मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची? देवेंद्र फडणवीसांचं सर्वात आक्रमक भाषण) 'आमच्याशी घटस्फोट न घेता दुसऱ्याशी लग्न केलं' "तुमचं हिंदूत्व हे गदाधारीचं आहे. तु्म्ही म्हणाले आम्हाला लाथ मारली. लाथ गधा मारतो. खरा पहिलवान ठोकर मारतो. लाथ गाढव मारतो. लक्षात ठेवा हा बदललेला भारत आहे. काश्मीरमध्ये आमच्या एका हिंदूची हत्या केली तर २४ तासाच्या आत तीन दहशवाद्यांची हत्या करणारा हा नवा भारत आहे. तुम्ही सवाल विचरण्याचा आत त्या ठिकाणी दहशतवाद्यांना मारण्याची ताकद नरेंद्र मोदींमध्ये आहे. तुमच्याकडे शर्जिल आला, भारत तोडण्याचा बोलला, निघूनही गेला. तुम्ही काय-काय बोलले? एकप्रेमी प्रेमातून अॅसिड फेकतो. आमची संपत्ती घेऊन आणि दुसऱ्या सोबत लग्न केलं. ऑफिशियल घटस्फोट तर द्यायचा. कालचं भाषण सोनिया गांधी यांना समर्पित होतं", अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. 'तुमच्या सत्तेचा ढाचा पाडल्याशिवाय थांबणार नाही' "उद्धव ठाकरे काय म्हणाले? देवेंद्र फडणीस यांनी पाय ठेवला असता तरी बाबरीचा ढाचा खाली आला असता. माझ्यावर एवढा विश्वास आहे? मी तुम्हाला सांगतो. कशाला लपवायचं? आज माझं वजन १०२ किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा १२८ होतो. उद्धवजींना ही भाषा नाही समजणार. उद्धवजी तुम्हाला वाटतंय, माझ्या पाठीवर खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी करु शकाल. लक्षात ठेवा हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली पाडल्याशिवाय थांबणार नाही", असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या