मुंबई, 15 मे : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे घेतलेल्या सभेत शिवसेनेवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची ही शिवसेना विरोधातील आतापर्यंतची सर्वात आक्रमक सभा ठरली. कारण देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शनिवारी घेतलेल्या सभेला सडेतोड उत्तर दिलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळ पासून ते जनसंघाचं स्वातंत्र्य चळवळीसाठी केलेल्या वक्तव्यांना उत्तरं दिली. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र सुरु असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय आक्रमकपणे प्रतिक्रिया दिली. “आरएसएस यांच्याबद्दल काँग्रेस जे बोलते तेच उद्धव ठाकरे बोलले. उद्धव ठाकरेंना माहिती तरी आहे का हेगडेवार यांचं नाव स्वातंत्र्य सेनानींमध्ये आहे. आणीबाणी लागली त्यावेळी तुम्ही कुणाच्या बाजूला होता? त्यावेळी तुम्ही इंदिरा गांधींच्या बाजूला होता. त्यांच्याकडे मुद्दा नसला की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र असल्याचं बोलतात. अरे कुणाच्या बापाची औकात आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची? कोण तोडू शकतं?”, असे सवाल देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे केले. “मी त्यांना पुन्हा इतिहासाकडे नेतो. काल जनसंघामध्ये बोलले. महाराष्ट्र शासनाने छापलेल्या गॅजेटियनमध्ये लिहिले आहे, संयुक्त महाराष्ट्र समितीत जनसंघ होता. काय मनात येईल ते बोलायचं. इतिहास वाचायचा नाही. जेव्हा बोलायला काही नसलं की मुंबई वेगळी करायीचीय. अरे मुंबई आम्हाला वेगळी करायची आहेच. पण महाराष्ट्रापासून नाही तर तुमच्या भ्रष्टाचारापासून”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. ‘तुम्ही कुठला सामना केला?’ “बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. उद्धवजी त्याच मैद्याच्या पोत्यावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालात. वजनदार लोकांपासून सांभाळून राहा. जितकं वरती वाटतं त्यापेक्षा दप्पट खाली आहे. काल कुणीतरी वाघ म्हणून ट्विट केलं. त्यांना समजवून सांगा, वाघाचा फोटो काढला म्हणून वाघ होता येत नाही. वाघ असेल तर निधळ्या छातीने आव्हानांचा सामना करावा लागतो. तेव्हा वाघ होता येतं. नुसती फोटोग्राफी करुन वाघ होता येत नाही. तुम्ही कुठला सामना केला? कुठल्या संघर्षाला तुम्ही होता? कुठल्याच संघर्षाला नाही. आजही दोन वर्ष कोरोनाचा संघर्ष चालला. उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह होते. आम्ही अलाईव्ह होतो”, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलं. ‘आमच्याशी घटस्फोट न घेता दुसऱ्याशी लग्न केलं’ “तुमचं हिंदूत्व हे गदाधारीचं आहे. तु्म्ही म्हणाले आम्हाला लाथ मारली. लाथ गधा मारतो. खरा पहिलवान ठोकर मारतो. लाथ गाढव मारतो. लक्षात ठेवा हा बदललेला भारत आहे. काश्मीरमध्ये आमच्या एका हिंदूची हत्या केली तर २४ तासाच्या आत तीन दहशवाद्यांची हत्या करणारा हा नवा भारत आहे. तुम्ही सवाल विचरण्याचा आत त्या ठिकाणी दहशतवाद्यांना मारण्याची ताकद नरेंद्र मोदींमध्ये आहे. तुमच्याकडे शर्जिल आला, भारत तोडण्याचा बोलला, निघूनही गेला. तुम्ही काय-काय बोलले? एकप्रेमी प्रेमातून अॅसिड फेकतो. आमची संपत्ती घेऊन आणि दुसऱ्या सोबत लग्न केलं. ऑफिशियल घटस्फोट तर द्यायचा. कालचं भाषण सोनिया गांधी यांना समर्पित होतं”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.