Home /News /mumbai /

ठाकरे सरकार पाडण्याबद्दल फडणवीसांनी केला मोठा दावा, म्हणाले...

ठाकरे सरकार पाडण्याबद्दल फडणवीसांनी केला मोठा दावा, म्हणाले...

'विरोधी पक्षनेता म्हणून सरकार जिथे चुकले त्यांच्या चुका लक्षात आणून देण्याचे काम करत आहोत.'

    मुंबई, 25 सप्टेंबर :  'ठाकरे सरकार हे सुडाच्या भावनेतून काम करत आहे. हे सरकार पाडण्याची कोणतीच आवश्यकता नाही.  उद्धव ठाकरे यांचे सरकार एक दिवस स्वत: हून कोसळेल, जर परिस्थितीत आली तर आम्ही सरकार बनवू', असं  म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दैनिक लोकमत या वृत्तपत्राला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'विरोधी पक्षनेता म्हणून सरकार जिथे चुकले त्यांच्या चुका लक्षात आणून देण्याचे काम करत आहोत. कोरोना काळातही आम्ही आरोप केले. राज्यात आम्ही कोणतेही ऑपरेशन लोट्स हाती घेतले नाही. एक दिवस हे सरकार स्वत: कोसळणार आहे. त्यामुळे हे सरकार पाडण्याचा विषयच येत नाही. मुळात असे सरकार चालतच नाही. ज्या दिवशी सरकार पडले, त्यावेळी परिस्थितीनुसार, शक्य झाल्यास आणि गरजेचं वाटल्यास सरकार बनवू' असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 'भाजपच्या मोठ्या नेत्यांना बाजूला केले आहे का? असा सवाल केला असता फडणवीस म्हणाले की, 'भाजपच्या टीमवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आमच्या पक्षात असे काही नाही. कोअर टीमच्या माध्यमातून सर्व निर्णय घेत असतो. पाच वर्ष सरकार चालवले आहे. त्यामुळे लोकांची प्रश्न घेऊन रोज चर्चेत असतो. जनतेच्या नजरेत आपण पुढे जातो, नाव जास्त समोर येत नाही. त्यामुळेच नवीन टीमही तयार झाली आहे. त्यामुळे जुन्यांना बाजूला सारले नाही.' 'एकनाथ खडसे यांनी जे काही आरोप केले आहे. त्यात काही तथ्य नाही. त्यांच्या आरोप बिनबुडाचे आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांना उत्तर देणार नाही', असं फडणवीस यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांना पुन्हा एकदा इन्कम टॅक्स विभागाने नोटीस दिली, यावरही फडणवीस यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. 'आम्ही कुणालाही त्रास देत नाही. दोन जणांनी तक्रार केली होती त्यानुसार ती कारवाई सुरू आहे. चंद्रकांत पाटील आणि माझ्याबद्दलही तक्रार केली होती. जर आम्हाला यात राजकारण करायचे असते तर दोन महिन्यांपूर्वीच केले असते. तेव्हा ही नोटीस दिली असती. कायदा आपले काम करत आहे', असं उत्तर फडणवीसांनी दिले. त्याच बरोबर, 'कंगनाला राजकारणात येण्याचा कल नाही. कंगना आणि शिवसेनेत जो वाद झाला, त्याला सरकारनेच वाढवले आहे. कंगना राणावत काही राष्ट्रीय नेत्या नाही. पण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केवळ त्यांचीच चर्चा करावी, हे योग्य आहे काय? आज एका महिलेनं सरकारला पराभूत केले आहे. काय प्रतिमा राहिली सरकारची? लोकशाहीमध्ये कुणीही राजा नसतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे', असा टोलाही फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला. 'बिहार निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी म्हणून नेमणूक केली. मधल्या काळात अनेक दिग्गज नेते गमावले आहे. त्यामुळे पक्षाने ही नवीन टीम केली आहे. माझी निवड झाली म्हणजे मी काही महाराष्ट्रातून निरोप घेतला असं नाही. त्यामुळे महाराष्ट्र सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही', असं सांगत राष्ट्रीय राजकारणात जाणार नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Uddhav Thackery, उद्धव ठाकरे, भाजप

    पुढील बातम्या