मुंबईतल्या आजीबाईंनी केली कमाल, 82व्या वर्षी केली कोरोनावर मात

मुंबईतल्या आजीबाईंनी केली कमाल, 82व्या वर्षी केली कोरोनावर मात

वृद्ध व्यक्तिंना कोरोना लवकर ग्रासण्याची शक्यता असते. मात्र प्रकृती चांगली असेल तर त्याही वयात कोरोनाला हरवता येते असं आता स्पष्ट झालं आहे.

  • Share this:

मुंबई 09 एप्रिल: मुंबईत कोरोना झपाट्याने पसरत आहे. सगळ्या देशाचं लक्ष मुंबईकडे लागलं आहे. धारावीत कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. हा गर्दी आणि दाटीवाटीचा भाग असल्याने तिथे कोरोना झपाट्याने पसरण्याची भिती आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासा देणारी घटना घडली आहे. कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या एका 82 वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर मात केली असून त्यांना आता सुटी देण्यात आली आहे.

या आजीबाई काही दिवसांपूर्वी गुजरातमधून मुंबईत आपल्या घरी आल्या होत्या. नंतर त्यांना काही लक्षणे जाणवायला लागली. त्यानंतर करण्यात आलेली त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आजीबाईंना कोरनावर उपचार करणाऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

आठवडाभराच्या उपचारानंतर त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली. आत्मविश्वास आणि आजाराशी लढण्याची तीव्र इच्छा असेल तर कोरोनावर 82व्या वयातही मात करता येते हेच या आजीबाईंनी दाखवून दिलं आहे.

वृद्ध व्यक्तिंना कोरोना लवकर ग्रासण्याची शक्यता असते. त्यातही ज्यांना किडनी, शुगर किंवा ब्लडप्रेशर असे आजार असतात त्यांना त्याचा जास्त धोका असतो. मात्र प्रकृती चांगली असेल तर त्याही वयात कोरोनाला हरवता येते असं आता स्पष्ट झालं आहे.

हे वाचा - धारावीतल्या 7 लाख 50 हजार लोकांचं 10 दिवसांमध्ये स्क्रिनिंग होणार

देशात कोरोनाचा विळखा वाढतो आहे. आता टेस्टिंग वेगाने होत असल्याने रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 549 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 17 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 5734 तर मृत्यूचा आकडा 166 वर गेला आहे. 473 जणांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिलीय.

अग्रवाल यांनी माहिती देतांना स्पष्ट केलं की PPE सूट, मास्क आणि व्हेंटिलेटर्सचा देशांतर्गत पुरवढा सुरू झाला आहे. देशात 20 उत्पादक PPE सूटची निर्मिती करत आहेत. 1 कोटी 7 लाख PPE सूटची मागणी नोंदविण्यात आली आहे. तर 49 हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यात आली आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

हे वाचा -  धारावीत कोरोनाचा तिसरा बळी; मुंबईचा सगळ्यात धोकादायक हॉटस्पॉट

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होत असून आता कोरोना रुग्णांची संख्या 1297 एवढी झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे राजधानी मुंबईत अवघ्या 12 तासांत 143 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

First published: April 9, 2020, 7:47 PM IST

ताज्या बातम्या