मुंबई, 16 नोव्हेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या वर्षा या शासकिय निवास्थानी लागोपाठ दुसऱ्या दिवशी आणखी एका शासकीय कर्मचाऱ्याला कोविड 19 चा संसर्ग झाला आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी OSD सुधीर नाईक यांचा कोविड चाचणी अहवाल कोविड पाँझिटीव्ह आला होता. त्यानंतर आता आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्याच वर्षा निवास्थानी कोविड 19 चा शिरकाव झाल्याने चिंतेचे वातावरण निर्णाण झाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी OSD सुधीर नाईक यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना वोक्हार्ट हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व अधिकरी आणि कर्मचाऱ्यांची कोविड 19 चाचणी करण्यात येतेय. त्याच वेळी आता आणखी एक कर्मचारी कोविड 19 चाचणीत पाँझिटिव्ह आल्यामुळे मुंबई महापालिकेने आता अधिक सतर्क होत सॅनिटायजेशन सुरू केलंय.
वर्षा निवास्थान परिसरातील सर्व शासकीय आणि खासगी निवास्थानी रहात असलेल्या नागरिकांचे दोन्ही डोस पुर्ण झाले आहेत की नाही..? याची सखोल तपासणी आता बीएमसीने सुरू केलीय. तसेच गरज भासल्यास आजारी आणि संशयित व्यक्तींची कोविड 19 चाचणी करण्यात येतेय.
वाचा : मुंबईतील 'या' भागात हवेचा दर्जा दिल्लीहूनही खराब; चिंता वाढवणारी आकडेवारी समोर
याआधीही मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोरोनाने शिरकाव केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना सुद्धा 20 तारखेला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रश्मी यांची चाचणी केली असता त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी कोरोनावर मात केली होती.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सर्व सेवा, सुविधा सुरू करण्यात येत आहेत. मात्र, आता त्याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवास्थानी कोरोनाचा संसर्ग होताना दिसत आहे. यामुळे चिंता वाढली आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती
राज्यात 15 नोव्हेंबर रोजी 686 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. तर याचवेळी 912 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.64 टक्के इतके झाले आहे. सोमवारी राज्यात 19 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 99,859 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1016 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील लसीकरणाची स्थिती
महाराष्ट्रात 14 नोव्हेंबर 2021 रोजी एकूण 1,57,525 नागरिकांचे लसीकरण कऱण्यात आले आहे. तर राज्यात आतापर्यंत 10,26,67,762 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, महाराष्ट्र