मुंबई, 29 एप्रिल: कोरोना विषाणूची (Coronavirus) साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर मुंबईतील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येला ब्रेक लागला असून दैनंदिन बाधितांची संख्या कमी होत आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, असे असताना आता चिंता वाढवणारी बातमी आली आहे कारण आज मुंबईत तब्बल 82 कोरोना बाधितांच्या मृत्यूची (82 Covid patients death in Mumbai) नोंद झाली आहे.
गेल्या सहा महिन्यांत सर्वाधिक मृत्यूची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासांत 82 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतकांची ही संख्या गेल्या सहा महिन्यातील सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे कोरोनामुळे होणारे मृत्यू हे चिंतेत भर टाकत आहेत. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज मृत्यू झालेल्या 57 रुग्णांपैकी काही दीर्घकालीन आजारी होते. 43 रुग्ण पुरुष तर 39 रुग्ण महिला होत्या. 3 रुग्णांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते. 51 रुग्णांचे वय 60 वर्षांहून अधिक होते. तर उर्वरित 28 रुग्ण हे 40 ते 60 वयोगटातील होते.
चिंता वाढली! राज्यात जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता
आज मुंबईत एकूण 38848 नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. आज एकूण 4192 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर त्याचवेळी 5650 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 88 टक्के इतका आहे. 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2021 पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.86 टक्के इतका आहे. मुंबईत रुग्ण दुप्पटीचा दर 79 दिवस इतका आहे.
मुंबईत तीन दिवस लसीकरण बंद
मुंबईत पुरेशा लस साठ्याच्या अभावामुळे शुक्रवार 30 एप्रिल 2021 ते रविवार 2 मे 2021 असे तीन दिवस लसीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे. तर शनिवार दिनांक 1 मे 2021 पासून नियोजित 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुरेशा लस साठ्याच्या अभावी पुढे ढकलण्याची शक्यता सुद्धा मनपाने वर्तवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BMC, Coronavirus, Mumbai