तुषार रुपनवर, प्रतिनिधी
मुंबई, 6 जानेवारी : राज्यात कोरोना बाधितांच्या रुग्ण संख्येत (Coronavirus in Maharashtra) झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसोबतच पोलीस कर्मचारी, बेस्ट बसचे सर्मचारी, शासकीय अधिकारी, मंत्री, आमदार, खासदार, डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात येताना दिसत आहेत. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी कठोर निर्बंध (strict restrictions) लावण्याची आवश्यकता असल्याचं बोललं जात आहे. राज्यात लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) लागणार का असा प्रश्न उपस्थित होत असताना आता यावर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
लॉकडाऊन लावण्यात येणार ?
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं, रुग्णवाढ झपाट्याने होत आहे हे नक्की मात्र किती रुग्ण संख्या वाढेल आणि किती पर्यंत आकडा जाईल हे आताच सांगतां येणार नाही. लॅाकडाऊन संदर्भात चर्चा होत आहे हे खरं आहे. मात्र लॅाकडाऊनची तुर्तास आवश्यकता नाही. निर्बंध हे अधिक कडक केले जातील.
तिसरी लाट आणि त्याची तिव्रता यावर लॅाकडाऊनचा निर्णय अवलंबून असेल. कोणालाही लॅाकडाऊन नकोय. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जे दिसून आलंय त्यानुसार कशा प्रकारे तिसऱ्या लाटेवर मात करता येईल त्यासाठी प्रयत्न आपले असतील असंही अमित देशमुख म्हणाले.
वाचा : Mumbai Corona Virus: मुंबईत आज 20 हजारहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह येण्याची शक्यता
डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात बाधा
राज्यातील डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होताना दिसून येत आहे. आठवड्याभरात कोविड झालेल्या डॅाक्टरांची संख्या 279 वर पोहोचली आहे. यावर अमित देशमख यांनी म्हटलं, डॅाक्टरांना मोठ्या प्रमाणात बाधा झालेली आहे. रुग्णालयात कडक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वाधिक कोविड बाधित डॉक्टर मिरजमध्ये आहेत. मिरजमधील 100 डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
येत्या आठ दिवसात बूस्टर डोस आरोग्य कर्मचारी यांना मिळणार आहे. त्यासंदर्भातील मोहिम वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे सुरू केली जाईल. तशी चर्चा ICMR सोबत सुरू आहे असंही अमित देशमुख म्हणाले.
मुंबईत कोरोनाचा उद्रेक
मुंबईत कोरोनाचं प्रचंड थैमान सुरु आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येने तर बुधवारी (5 जानेवारी) पहिल्या आणि दुसऱ्या कोरोनाच्या लाटेचाही रेकॉर्ड मोडला आहे. मुंबईत दिवसभरात तब्बल 15 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे चाचणी करणाऱ्या प्रत्येक तीन जणांनंतर चौथी व्यक्ती कोरोनाबाधित आढळत आहे. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट हा थेट 25 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 15 हजार 166 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधितांचा हा वाढता आकडा प्रचंड चिंता वाढवणारा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown, महाराष्ट्र