मुंबई, 1 जानेवारी : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतना दिसत आहे. यासोबतच कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Coronavirus Omicron Variant) बाधित रुग्णांच्याही संख्येत वाढ होत आहे. याच दरम्यान राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास (Dr. Pradeep Vyas) यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी एक भीती व्यक्त केली आहे.
रुग्णसंख्या 2 लाखांवर जाण्याची शक्यता
आपल्या पत्रात डॉ. प्रदीप व्यास यांनी म्हटलंय, कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ही वाढ अशीच सुरू राहिली तर जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोना बाधितांची संख्या 2 लाखांवर जाण्याची शक्यता आहे.
वाचा : मुंबई-पुण्याची स्थिती वेगाने बिघडलीय म्हणत अजित पवारांनी दिले Lockdown चे संकेत
80 हजार मृत्यू होण्याची भीती
तसेच ही रुग्णसंख्या वाढत राहिली आणि 80 लाखांवर गेली तर मृत्यू दर एक टक्का याप्रमाणे पाहिलं तर राज्यात 80 हजार मृत्यू होऊ शकतात अशी भीतीही त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या या लाटेला गांभीर्याने घेण्याच्या सूचना आणि सल्ला ही त्यांनी पत्रातून दिला आहे.
ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य आहेत असं समजू नका. ज्यांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली नाहीये आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी ओमायक्रॉन व्हेरिएंट घातक आहे. तिसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग खूपच वेगाने आणि मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळेच लसीकरण वेगाने करा असंही डॉ. प्रदीप व्यास यांनी म्हटलं आहे.
वाचा : Co-WIN वर लहान मुलांच्या लसीकरणाची नोंदणी Live, अशी आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया
ओमायक्रॉनचे 55 टक्के रुग्ण
राज्यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ (Delta variant) चे 13 टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ (Delta Derivatives) चे 32 टक्के तर ‘ओमायक्रॉन’चे 55 टक्के रुग्ण आढळले आहे. कोविड 19 विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणाऱ्या चाचणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केली जात आहेत. या अंतर्गत मुंबईतील 282 रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे 13 टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे 32 टक्के तर ‘ओमायक्रॉन’ चे 55 टक्के रुग्ण आढळले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सातव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण 376 रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील 282 रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. त्यामुळे या 282 नमुन्यांसंदर्भातील निष्कर्ष देण्यात येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mumbai, महाराष्ट्र