मुंबई, 21 जुलै : एकिकडे मुंबईतील कोरोना (mumbai coronavirus) रुग्ण दरवाढीचा दर घटला आहे, ही दिलासादायक बातमी आहे तर दुसरीकडे बहुतेक मुंबईकरांना कोरोना होऊन गेला मात्र त्यांना त्याची माहितीही नाही, यामुळे चिंता वाढली आहे. एका खासगी प्रयोगशाळेने केलेल्या अँटिबॉडी चाचणीमध्ये (antibody test) ही धक्कादायक बाब समोर आली आहे. एका खासगी प्रयोगशाळेने अँटिबॉडी टेस्ट केली. त्यामध्ये काही लोकांच्या शरीरात कोरोनाविरोधात अँटिबॉडीज तयार झाल्याचं दिसलं. याचा अर्थ या लोकांना कोरोनाची लागण झाली होती. भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. अशिष शेलार यांनी सांगितलं, “थायरोकेअर लॅबने केलेल्या अँटिबॉडी चाचण्यांमध्ये वरळीत 32.15 टक्के, घाटकोपरला 36.7 टक्के, सांताक्रुजला 31.45 टक्के तर वांद्रे पश्चिमेला 17 टक्के जणांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे”
आशिष शेलार यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांना पत्र लिहिलं आहे आणि एक लाख अँटिबॉडी चाचण्या करून त्याचा अहवाल जाहीर करण्याची मागणी केली आहे.
आशिष शेलार यांनी पत्रात म्हटलं आहे, “मुंबईतील कोरोना संक्रमणाची सद्यस्थिती अचूकपणे समजण्यासाठी किमान एक लाख लोकांची चाचणी करण्यासाठी पालिकेने तातडीने मुंबई पावले उचलावीत. महापालिकेने सर्व सार्वजनिक आणि खासगी प्रयोगशाळांमधून उपलब्ध अँटीबॉडी डेटा संकलित केला पाहिजे. त्यानंतर त्याचं विश्लेषण केलं पाहिजे. हा सर्व डेटा सहज उपलब्ध आहे आणि येत्या सात दिवसांच्या कालावधीत निष्कर्षांसह डेटाचा निकाल मुंबईकरांना उपलब्ध करून द्यावा” हे वाचा - कोरोना विषाणूविरोधात इम्युनिटी निर्माण झाली का? मुंबईत कमी झाला रुग्णवाढीचा दर दरम्यान मुंबईत रुग्णवाढीचा दर आणखी कमी होऊन आता 1.21 टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ झाली आहे. धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात आणि झोपडपट्टीत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. मध्य मुंबईतही साथ आटोक्यात आहे. मुंबईतील रूग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता 1.21 % असा झाला आहे. रविवारी हा 1.26% होता. हे वाचा - ऑक्सफर्डच्या कोरोना लशीमुळे आशा पल्लवित; आता भारतातही होणार ह्युमन ट्रायल मुंबईच्या 13 विभागात हा सरासरी दर 1.2% पेक्षा कमी आहे. या 13 पैकी 9 विभागात रुग्णवाढ 1% पेक्षाही कमी होते आहे. तर इतर 6 विभागातही हा सरासरी दर 1.4% पेक्षा कमी आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणखी वाढून आता 57 दिवसांवर पोहोचला आहे. काल हा कालावधी 55 दिवस होता. त्यामुळे मुंबईतसुद्धा कोरोनाविरोधात लढण्याची शक्ती आपोआप नागरिकांमध्ये निर्माण होते आहे का याविषयी चर्चा सुरू आहे.