मुंबई, 24 एप्रिल: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर ‘कोरोना कोविड 19’ प्रतिबंधासाठी सर्वस्तरीय कार्यवाही अविरतपणे सुरू आहे. या कार्यवाहीमध्ये सहभागी होण्याची इच्छा काही संस्थांनी दाखवली होती. आता मात्र ऐनवेळी नकार दिल्याचं समोर आलं आहे. ‘कोरोना कोविड 19’ प्रतिबंधासाठी सर्वस्तरीय कार्यवाहीत ‘मॅजिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड’ (वन् रुपी क्लिनिक) या संस्थेने स्वत:हून इच्छा दर्शवली होती. त्यानुसार या संस्थेच्या डॉक्टरांना महापालिकेच्या अखत्यारीतील काही विलगीकरण केंद्रांवर (आयसोलेशन सेंटर) कार्यरत असलेल्या महापालिकेच्या डॉक्टरांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी या कामास आता स्पष्ठ नकार दिल्यानंतर त्यांना ‘क्वारंटाईन सेंटर’ मध्ये कार्यरत महापालिकेच्या डॉक्टरांसोबत काम करता येऊ शकेल, असे सूचविण्यात आले. मात्र, मॅजिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडने याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही. हेही वाचा… धक्कादायक! कोरोनाच्या धास्तीने गावाच्या वेशीवरच अडवला वृद्धाचा मृतदेह आणि… त्यानंतर सदर संस्थेद्वारे महापालिकेच्या ‘फिव्हर क्लीनिक’मध्ये काम करण्याची इच्छा दर्शवली होती. तथापि, महापालिकेच्या ‘फिव्हर क्लिनिक’चे काम हे प्रामुख्याने तंत्रज्ञांद्वारे केले जाते. तसेच त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आहे. महापालिकेची सध्याची गरज डॉक्टरांची आहे, हे लक्षात घेऊनच त्यांच्या डॉक्टरांना प्रथम ‘विलगीकरण केंद्रात’ व त्यानंतर ‘क्वारंटाईन सेंटर’ येथे कार्यरत असणाऱ्या महापालिकेच्या डॉक्टरांना मदत करण्यास सांगण्यात आले होते. मात्र या दोन्ही बाबींना त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हेही वाचा… COVID-19 च्या सर्व चाचण्या व उपचार निशुल्क, सरकारनं घेतला मोठा निर्णय याच अनुषंगाने महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शु्क्रवारी संपन्न झालेल्या बैठकीला त्यांना अधिकृतपणे आमंत्रित करण्यात आले होते. मात्र या बैठकीला सदर संस्थेद्वारे कोणीही प्रतिनिधी उपस्थित राहिले नसल्याची माहिती मिळाली आहे. संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.