Home /News /mumbai /

...म्हणून मी मुख्यमंत्री झालो, वर्धापन दिनी भाजपला टोला लगावत उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

...म्हणून मी मुख्यमंत्री झालो, वर्धापन दिनी भाजपला टोला लगावत उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

'मला काहीजण म्हणतात की तुम्ही आल्यापासून एका मागोमाग वादळ येत आहे. पण शिवसेना एक वादळ आहे आणि शिवसैनिक हे कवच आहेत.'

मुंबई, 19 जून : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात शिवसेनेच्या नेत्यांसोबत भगवा ध्वज फडकवला. तसंच यावेळी शिवसैनिकांसोबत संवादही साधला. ''मला काहीजण म्हणतात की तुम्ही आल्यापासून एका मागोमाग वादळ येत आहे. पण शिवसेना एक वादळ आहे आणि शिवसैनिक हे कवच आहेत,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. 'अन्याय सहन करू नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. आपल्यासोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला तो आपण मोडीत काढला. त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे,' अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला. 'हिमालयाच्या मदतीला नेहमीच सह्याद्री धावून आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी सध्याकाळी बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहणार आहे,' अशी माहिती यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली. 'राम मंदिराचा निकाल आला आणि आपल्याकडे मुख्यमंत्रिपद आलं' 'शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही डगमगणार नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक. हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे. शिवसेनेने आपली विचारधारा बदललेली नाही. मी शिवनेरीला आणि एकविरेला दर्शनाला गेलो. शिवनेरीवरची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात राम मंदिराचा निकाल आला. आपल्याकडे मुख्यमंत्रिपद आलं. शिवनेरीच्या मातीची ही कमाल आहे,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे: - मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्या सोबत संपर्क जरी कमी झाला असला तरी मी अंतर कमी पडू देणार नाही. - कस्तुरबा आणि पुणे येथे फक्त दोनच लॅब होत्या त्या आता आपण 100 लॅब केले आहेत आणि आपण लॅब आणखी वाढवणार आहोत. - शिवसेनाप्रमुखांची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे. - विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही आमची संस्कृती आहे. प्राण जाय पर वचन न जाये ही आमची संस्कृती आहे. - ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेनाप्रमुख सुद्धा लाचार होणार नाही. - शिवसैनिकांच्या प्रेमाचा ओलावा माझ्या अंगावर आहे. - मुंबई ही रक्त सांडून महाराष्ट्राने मिळवलेली आहे कोणाला आंदण म्हणून दिलेली नाही. म्हणून आपण रक्तदानाचा विश्वविक्रम केला आहे. - कोरोना हे आपल्या देशावर आलेले विचित्र संकट आहे. - शिवसेनेच्या शाखा या आता दवाखाने बनतील. डॉक्टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत.जसे की , मास्क, पी पी ई किट, हॅन्ड ग्लोज. - जीवाची पर्वा न करता बेभान होऊन जनतेसाठी झटणारा हा शिवसैनिकच असू शकतो. - वादळ येऊ चक्रीवादळ येऊ कोणतंही संकट येऊ तुमच्यासारखा शिवसैनिक माझ्यासोबत जोपर्यंत आहे मला कशाचीही भीती नाही. - अशीच साथ सर्वांनी नेहमीच शिवसेनेसोबत द्या आणि सर्वांनी आपली काळजी घ्या. संपादन - अक्षय शितोळे
First published:

Tags: Shivsena, Uddhav thackeray

पुढील बातम्या