हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला

हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला

'तुम्ही आम्हाला म्हणता ना हिंदुत्ववादी तर मग ठीक आहे. सूडचक्र तुमच्याकडे, आमच्याकडे सुदर्शन चक्र आहे. आमच्याकडे पण चक्र आहे. आम्हीही मागे लावू शकतो'

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्तीनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीतून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.  'हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व सोडणे म्हणजे काय? धोतर नाहीये ते.. हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं' असं म्हणत राज्यपालांना सणसणीत टोला लगावला आहे.

दैनिक सामनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्यपाल आणि भारतीय जनता पक्ष दोघांचाही एकच आरोप आपल्यावरती आहे, तो म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलंय का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले की,  'हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व सोडणे म्हणजे काय? धोतर नाहीये ते.. हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत.

तसंच, 'महाराष्ट्राला आव्हानं देणाऱ्यांना माझं म्हणणं आहे की, अशी आव्हानं देऊन तुम्ही सूडचक्र करणार असाल तर सूडचक्रात आम्हाला जायची इच्छा नाही. पण तुम्ही तशी वेळ आणलीतच तर तुम्ही आम्हाला म्हणता ना हिंदुत्ववादी तर मग ठीक आहे. सूडचक्र तुमच्याकडे, आमच्याकडे सुदर्शन चक्र आहे. आमच्याकडे पण चक्र आहे. आम्हीही मागे लावू शकतो', असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

संजय राऊत - मंदिरे उघडण्याच्या निमित्ताने हा विषय सुरुवातीला आला. आपण आता मंदिरे उघडलेली आहात, पण मंदिरं उघडणं आणि हिंदुत्व यांचा काही संबंध आहे का?

मुख्यमंत्री – मी शिवसेनाप्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचं हिंदुत्व मानतो.  शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय… मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे… आणि ते त्यांनी 92-93 साली करून दाखवलं. बाबरी पाडली गेली, मी म्हणेन त्याचेसुद्धा श्रेय घेण्याची कुणाची हिंमत नव्हती, ती शिवसेनाप्रमुखांनी   दाखवली. सर्व ताकदीने सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची तुमची हिंमत नव्हती. ते कोर्टाच्या निकालामुळे तिकडे होतं. राममंदिराचं श्रेय कुठल्याही राजकीय पक्षाने घेऊ नये. कारण तो न्यायालयाने दिलेला निकाल आहे, सरकारने ठरवलेलं नाही. मग हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे फक्त पूजाअर्चा करणं आणि घंटा बडवणं आहे काय? त्याने कोरोना नाही जात हे सिद्ध झालेलं आहे. उगाच कोणत्याही धर्माच्या आडून तुम्ही राजकारण करू नका. आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. पहिलं  या देशातलं भगव्याचं स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलं. त्याच्यामुळे निदान महाराष्ट्राच्या मातीला तरी हिंदुत्व… आणि तेही तुमचं दलालांचं हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नका.

संजय राऊत - लव्ह जिहादचा एक नवीन विषय समोर आलाय…

मुख्यमंत्री –  लव्ह जिहाद राजकारणात का नसावं? लव्ह जिहादचं राजकारण हा भाग वेगळा.. पण लव्ह जिहाद म्हणजे काय? मुस्लिम युवकाने हिंदू युवतीशी लग्न करायचं याला त्यांचा विरोध आहे. मग तुमची मेहबुबा मुफ्तीसोबत युती कशी चालली? नितीशकुमारांबरोबर कशी चालली? चंद्राबाबूंसोबत कशी चालली? ज्या ज्या युत्या तुम्ही केल्या… त्यात भिन्न विचारांचे पक्ष तुम्ही एकत्र येऊन युती चालते हे लव्ह जिहाद नाही? आहेच ना?

संजय राऊत - गोध्रा दंगलीनंतर रामविलास पासवान यांनी मोदींवर टीका करून केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता…

मुख्यमंत्री – त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचलात. हे राजकीय लव्ह जिहाद नाही? आणि वापरून पुन्हा सोडून देणं… म्हणजे तलाक केलाच ना तुम्ही राजकारणातसुद्धा!

संजय राऊत - पण महाराष्ट्रात लव्ह जिहाद आहे का? कारण लव्ह जिहाद विरुद्ध कायदा करा अशी भाजपची मागणी आहे. कारण उत्तर प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश…

मुख्यमंत्री – 'आम्ही ‘येस सर’ करून कायदा करू, पण तो करताना मी अनेकदा बोललो आहे, आजही परत सांगतो. तुम्ही गोवंश हत्याबंदीचा कायदा करा अगदी कश्मीर ते कन्याकुमारी… आता कश्मीरचं सगळं बंधन उठवलंय ना तुम्ही.. गोव्यात करा गोवंश हत्याबंदी, तुमचं सरकार आहे. इतरत्र करा. तुमच्याकडे ईशान्येतील राज्ये आहेत, तिथे करा गोवंश हत्याबंदी… का नाही करत? केरळ किंवा जिथे जिथे आजही सगळ्या गोष्टी चालू आहेत, तिकडे हा निवडणुकीचा मुद्दा करायचा आणि निवडणूक लढवायची. आणि मग लोकांनी मतं दिली तर कायदा करायचा… पण सोयीचं घ्यायचं…हे सोयीचं हिंदुत्व आम्ही नाही केलं… जे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं, जनतेच्या हिताचं असेल ते कर… मग ते आपल्याला गैरसोयीचं असलं तरी जनतेसाठी कर! राजकारणासाठी तुम्ही हिंदुत्व नका घेऊ'

Published by: sachin Salve
First published: November 27, 2020, 9:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading