जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / News18 Lokmat Exclusive : 'आमचा शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प', एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

News18 Lokmat Exclusive : 'आमचा शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प', एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

शिवेसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज ‘न्यूज18 लोकमत’ला विशेष मुलाखत दिली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 जुलै : शिवेसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज ‘न्यूज18 लोकमत’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आगामी पुढच्या अडीच वर्षात नवं सरकार काय-काय कामे करेल याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे या सरकारला शेतकऱ्यांसाठी (Farmers) महत्त्वाची तरतूद करायची आहे. त्यांच्यासाठी विविध योजना आणायच्या आहेत जेणेकरुन शेतकऱ्यांची आत्महत्या नाहीशी होईल, महाराष्ट्र आत्महत्यामुक्त होईल, असा संकल्प असल्याचं एकनाथ शिंदे मुलाखतीत म्हणाले. “महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हेच स्वप्न आणि ध्येय आमचं आहे. विकास कामे पूर्ण करायचे आहेत. मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यास मुंबईतील दळणवळण यंत्रणा सक्षम होईल. शेतकऱ्यांशी संबंधित जलसंपदा विभागातील अनेक प्रकल्प रखडलले आहेत ते प्रकल्प मार्गी लागले तर मोठ्या प्रमाणातील पाण्याचं सिंचन होईल. बळीराजा हा आपला मायबाप आहे. त्याला सुखी करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही महत्त्वाची पाऊलं उचलणार आहोत. त्याचबरोबर शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आमचा आहे. खूप मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. ( मुख्यमंत्रीपद मिळालं, परंतू आता खरी अग्निपरीक्षा; शिंदे गटात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू ) “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याच्या भवितव्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून या राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढू. राज्यात मोठमोठे उद्योग येतील, यासाठी आमचा प्रयत्न असेल. राज्याच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करु”, असं शिंदे यांनी सांगितलं. “सर्व घटकांना न्याय देण्याचं काम हाच आमचा प्रमुख अजेंडा आहे. कारण शेवटी राज्याची प्रगती हिच महत्त्वाची असते. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. सत्तांतर कसं घडलं? एकनाथ शिंदे यांनी या मुलाखतीत राज्यात सत्तांतर कसं घडलं, याबाबतही माहिती दिली. “माझ्याबरोबर जे 50 आमदार आहेत त्या सर्व आमदारांनी हा चमत्कार घडवलेला आहे. मी कोण आहे? मी निमित्त मात्र आहे. एकीकडे सत्ता होती. मोठमोठे नेते होते. पण दुसरीकडे एकनाथ शिंदे नावाचा एक छोटा कार्यकर्ता होता ज्याच्यावर या सगळ्या 50 आमदारांनी विश्वास ठेवला. किती संकट आले, किती प्रयत्न झाले तरीसुद्धा ते डगमगले नाहीत. ते माझ्यावर ठामपणे विश्वास ठेवून राहिले. कारण त्यांचा हिंदुत्वाचा आणि विकासाचा मुद्दा होता. त्यांच्या मतदारसंघातील कामे, विकास आणि राज्याच्या विकास हे धोरण घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. त्यामुळे आम्ही आज पुढे घेऊन चाललो आहोत. 50 लोकं एकत्र येवून सत्तेपासून दूर होतात हा इतिहास रचला गेला आहे. आमच्या निर्णयाला केंद्र सरकारने मदत केली आणि पाठिंबा दिला”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात