चंद्रकांत पाटलांचा सरकारला थेट इशारा, म्हणाले दोन दिवसांत घेतो स्फोटक पत्रकार परिषद

चंद्रकांत पाटलांचा सरकारला थेट इशारा, म्हणाले दोन दिवसांत घेतो स्फोटक पत्रकार परिषद

चंद्रकांत पाटील यांच्या खळबळजनक विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 जानेवारी: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. सर्वाधिक जागा भाजपला मिळत असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. भाजपला मिळालेल्या यशाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना एक खळबळजनक विधान केलं आहे. ते म्हणजे, पुढील दोन दिवसांत आपण स्फोटक पत्रकार परिषद घेणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार सत्तेचा दुरुपयोग कसा झाला, याचा भंडाफोड करणार असल्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा... MBA नंतर बडी कंपनी सोडून परतला गावात; उच्चशिक्षित तरुणानं असं घडवलं सत्तांतर

ग्रामपंचायत निवडणुकीत ज्याप्रमाणे भाजपला यश मिळालं, तसंच यश नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत देखील मिळालं होतं. पण या निवडणुकीत आघाडी सरकारनं कशा पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग केला, हे लवकरच आपल्यासमोर मांडणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. पदवीधर निवडणुकीत प्रचंड हेराफेरी झाली असल्याचा आरोप यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला.

मराठवाडा पदवीधरमध्ये 5000 मतपत्रिका कोऱ्या निघाल्या. तर पुणे पदवीधरमध्ये 2500 नावं ही पदवीपेक्षाही खालचं शिक्षण असलेल्या मतदार निघाले. धक्कादायक म्हणजे 11000 नावं दुबार होती, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

हेराफेरीचं प्रात्याक्षिक दाखवणार

चंद्रकांत पाटील म्हणाले, शेवटच्या एका तासांत 900 पैकी 300 बुथवर विक्रमी मतदान झालं आहे. पदवीधरचं एक मतदान होण्यासाठी साधरण तीन मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र, शेवटच्या एका तासांत एवढं मतदान कसं झालं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याचा अर्थ असा की, पदवीधर निवडणुकीत प्रचंड हेराफेरी झाली आहे. यासंदर्भात आपण येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन झालेल्या हेराफेरीचं प्रात्याक्षिक दाखवणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितलं. चंद्रकांत पाटील यांच्या खळबळजनक विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आलं आहे.

लवकरच महाविकास आघाडीची पोलखोल...

पदवीधर निवडणुकीत मोठी हेराफेरी झाली. तरी देखील लोकशाहीमध्ये आलेला निकाल आम्ही मान्य केला आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांना एकट्या भाजपनं लढत दिली. त्यामुळे त्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला, असं आम्ही मान्य करत नाही. याबाबत राज्य निवडणूक आयोग आणि मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाल्या आहेत. निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे आपण लवकरच स्फोटक पत्रकार परिषद घेऊन राज्यात झालेल्या काही निवडणुकांची पोलखोल करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं. आता चंद्रकांत पाटील महाविकास आघाडी सरकारबाबत काय पोलखोल करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: January 18, 2021, 8:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या