मुंबई, 1 जून : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी सचिन वाझेला (Sachin Vaze) माफीचा साक्षीदार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. सचिन वाझेने दाखल केलेला अर्ज मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टाने स्वीकारला आहे. त्यामुळे सचिन वाझे माफीचा साक्षीदार म्हणून घोषित झाला आहे. सचिन वाझेने मुंबईच्या सीबीआय विशेष न्यायालयात (CBI Special Court) माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता. त्याचा तो अर्ज सीबीआय विशेष न्यायालयाने स्वीकारला आहे. या अर्जाच्या आधारावर सचिन वाझे आता या प्रकरणात माफीचा साक्षीदार झाल्याचं कोर्टाने घोषित केलं आहे. खरंतर या संपूर्ण प्रकरणात सचिन वाझेचा महत्त्वाची भूमिका आहे. प्रत्येक घटनेत सचिन वाझे हा केंद्रस्थानी आहे. 100 कोटी घोटाळा प्रकरणात सीबीआय तपास करत आहे. या प्रकरणात सचिन वाझेने दिलेल्या कबुली जबाबामुळे हे प्रकरण उलगडण्यात सीबीआयला मोठं यश आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सचिन वाझेने माफीच्या साक्षीदाराचा अर्ज न्यायालयात केलेला होता. सचिन वाझेच्या माफीच्या साक्षीदाराच्या अर्जावर आज कोर्टात सुनावणी झाली. अनिल देशमुखांचे खासगी सचिव कुंदन शिंदे यांनी सचिन वाझेच्या माफीच्या साक्षीदाराच्या अर्जाला विरोध केला होता. पण सचिन वाझेंचे वकील रौनक नाईक यांनी न्यायालयात एक जजमेंट वाचून दाखवलं. यावर सीबीआयनेदेखील माफीच्या साक्षीदारावर विरोध करता येऊ शकत नाही, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अखेर न्यायालयाने सचिन वाझेला माफीचा साक्षीदार म्हणून घोषित केलं आहे. सचिन वाझे आता याच मार्गाने जेलमधून सुटकेचा मार्ग काढतो का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सचिन वाझेला आजच्या सुनावणीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं होतं. त्याला न्यायालयाने आदेश वाचून दाखवला आहे. वाझेला खरंच पश्चाताप की सुटकेचा मार्ग? 100 कोटी वसूली, स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणी सध्या जेलची हवा खात असलेल्या माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे हा आता माफीचा साक्षीदार बनला आहे. याकरता वाझेने मुंबईसत्र न्यायालयातील विशेष CBI न्यायालयात अर्ज केला होता. वाझेच्या या अर्जावर CBI ने देखील संमती दर्शवली होती. मात्र वाझेला खरंच पश्चाताप झालाय की माफीचा साक्षीदार बनून वाझे या गंभीर गुन्ह्यातून आपली सुटकेचा मार्ग काढतोय, अशी आता चर्चा सुरु झालीय. ( पुण्यात संजय राऊत आणि वसंत मोरे यांच्यात भेट, मनसेला मोठा झटका बसणार? ) सीबीआयच्या विनंतीपत्रामुळे वाझेला दिलासा क्षिण मुंबईतील मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली कार पार्क करणे आणि हे बिंग फुटू नये म्हणून मनसुख हिरनची केलेली हत्या यानंतर 100 कोटी वसूली करण्याचा झालेला खुलासा या सर्व प्रकरणात केंद्रस्थानी असलेला माजी पोलिस अधिकारी आता 100 कोटी वसूली प्रकरणी CBI च्या प्रकरणात माफीचा साक्षीदार झालाय. न्यायालयाने वाझेला अटी-शर्तींवर 100 कोटी वसूली प्रकरणी माफीचा साक्षीदार घोषित केलंय. यात महत्वाची भूमिका बजावली ती CBI ने. वाझेला माफीचा साक्षिदार बनवावा याकरता CBI ने विशेष CBI न्यायालयात विनंती पत्र दिले होते. सीबीआयने सादर केलेले पत्र सचिन वाझेला 15 वर्षांनी पुन्हा सेवेत घेण्यात आले ते फक्त विशेष प्रकरणावर काम करण्यासाठी. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सहमतीने वाझेला जाणीवपूर्वक अनेक महत्वाच्या आणि खळबळजनक केसेस सोपवण्यात आल्या, ज्याबाबत अनेकदा गृहमंत्र्यांनी सचिन वाझेला थेट सुचना केल्या आहेत. तसेच सचिन वाझे तपास करत असलेल्या महत्त्वाच्या आणि खळबळजनक केसेसची सर्व माहिती गृहमंत्र्यांना होती. एवढंच काय तर महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आणि इतरांनी अधिकार्यांच्या बदल्या आणि नियुक्तीवर अवाजवी प्रभाव टाकला आणि त्याद्वारे अधिकार्यांच्या अधिकृत कर्तव्याच्या कामगिरीवर अवाजवी प्रभाव पाडला गेला. याबाबत CBI ने तपासात भक्कम पुरावे गोळा केले असून सचिन वाझेने दिसेल्या कबुली जबाबामुळे देखील अनेक मुद्दे स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे CBI ला तपासकामी मदत होत आहे. ॲाक्रेस्ट्रा, बार आणि इतर आस्थपानांकडून गैरपद्धतीने पैसे गोळा करण्याबाबत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, त्यांचे पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा गुन्हेगारी सहभाग असून त्याबाबत भक्कम पुरावे सचिन वाझेने CBI ला दिले आहेत. एवढंच काय तर सचिन वाझेला पुन्हा पोलीस सेवेत घेण्याबाबत नेमके काय घडले याबाबतही सविस्तर माहिती आणि पुरावे सचिन वाझेने CBI ला दिले आहेत. पैसे कसे गोळा केले जायचे त्याकरता माणसे कशी दिली जायची त्याची मोडसोपरेंडी काय होती याबाबत देखील वाझेने सविस्तर माहिती, कागदोपत्री पुरावे CBI ला दिले आहेत. सचिन वाझे याने त्याचा कबूली जबाब सिलबंद पाकिटात कोर्टाला सादर केलाय. तो माननीय न्यायालयाने मान्य करावा आणि सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार बनवावे, अशी विनंती सीबीआय कोर्टाला करत आहे. वाझेला माफीचा साक्षीदार घोषीत करताच तात्काळ वाझेकडून जामिनाकरता अर्ज करण्यात येणार आहे. याकरता 7 जूनला सचिन वाझेला प्रत्यक्ष कोर्टात हजर केले जाणार आहे. माफीचा साक्षीदार झाल्याने वाझेचे अनेक फायदे होवू शकतात. वाझेला १०० कोटी वसूली प्रकरणात जामीन मिळू शकतो, वाझेला निर्दोष सोडले जाऊ शकते, अथवा त्याला नाममात्र कारावास होवू शकतो. तथा दंडाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. अशा प्रकारे वाझे स्वतःला वाचवण्याकरता शरण येवून आपल्या सुटकेचा मार्ग तर मोकळा करत नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. तरीही वाझेची सूटका नाहीच? असं असलं तरी मनसुख हिरन हत्या प्रकरण आणि स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करणे या दोन्ही प्रकरणात सचिन वाझे मात्र अजूनही आरोपी आहे. या दोन्ही प्रकरणाची सुनावणी NIA कोर्टात सुरु असताना सचिन वाझेने थेट कोर्टाला 3 पानी पत्र लिहिले होते. त्या पत्रात अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर वाझेने गंभीर आरोप करत माफीचा साक्षीदार होण्याचा प्रयत्न केला होता. तर अशाचप्रकारे चांदिवाल कमिशन आयोगात देखील वाझेने माफीचा साक्षीदार बनवण्याची विनंती केली होती. पण ती विनंती फेटाळण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.